Wardha Navratri Story : गेल्या 40 वर्षांपासून तळेगावची परंपरा! देवीची मूर्ती तलावाच्या मधोमध विराजमान, भाविकांची गर्दी
Wardha Navratri Story : जिल्हाभरातील नागरिकांची येथे देवीच्या दर्शनासाठी गर्दी दिसून येते. काय आहे ही परंपरा जाणून घ्या
Navratri 2022 : वर्धा जिल्ह्यातील तळेगाव (Talegaon) टालाटुले या गावी अनोख्या पद्धतीने नवरात्री (Navratri ) उत्सव साजरा केला जातो. गेल्या 40 वर्षांपासून चक्क 20 फूट खोल असलेल्या तलावात मध्यभागी देवीची स्थापना केली जाते. जिल्हाभरातील नागरिकांची येथे देवीच्या दर्शनासाठी गर्दी दिसून येते. काय आहे ही परंपरा जाणून घ्या
देवीची मूर्ती तलावाच्या मधोमध विराजमान
तळेगाव टालाटुले या गावात विशेष म्हणजे लाकूड आणि प्लास्टिक ड्रमच्या आधारावर देवीची मूर्ती तलावाच्या मधोमध विराजमान झाली आहे. एवढेच नाही तर तलावात तसेच या मंदिराभोवती आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे. देवीच्या मंडपापर्यंत जाण्यासाठी लाकूड आणि प्लास्टिकच्या ड्रमने तयार केलेल्या एका बोटीच्या साहाय्याने भक्तांना आत घेऊन जातात. फक्त नवरात्रीत सादर केला जाणारा हाच आकर्षक आणि अनोखा देखावा बघण्यासाठी जिल्हाभरातील भक्त या ठिकाणी येत असतात.. दिवस-रात्र भक्तांची रेलचेल बघायला मिळते..
जय अंबे जय दुर्गेचा जयघोष
ज्या बोट ने भक्त दर्शनासाठी जात आहेत ती बोट बनवण्यासाठी जवळजवळ एक महिन्याचा कालावधी लागतो. 'जय अंबे जय दुर्गेच्या' जयघोषात या वातावरणात मोठ्ठा उत्साह आणि सकारात्मता निर्माण झालीय.
.....यामुळे तळेगाव नाव पडलं
विसर्जनाच्या वेळी गावात देवीची मिरवणूक काढून पुन्हा याच तलावात विसर्जन केले जाते. गावात हे मोठं तळं असल्यामुळे तळेगाव नाव पडलं असावं असं इथले नागरिक सांगतात. आणि याच तळेगावातील जवळजवळ 18 एकर परिसरातील तलावात गावकऱ्यांनी आदिमायेची स्थापना करून नवरात्रीच्या निमित्ताने एक विशेष ओळख निर्माण करून दिली आहे.