Maharashtra Unseasonal Rain : महाराष्ट्राला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता, एप्रिल महिन्याअखेरीस पावसाचा अंदाज
Maharashtra Unseasonal Rain : एप्रिल महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्राला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात एप्रिलच्या शेवटाला पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Maharashtra Unseasonal Rain : एप्रिल महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्राला (Maharashtra) पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) फटका बसण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने (IMD) हा अंदाज वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात (Marathwada) एप्रिलच्या शेवटाला पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कोकणातील (Konkan) तापमान कोरडे राहणार, मुंबई-ठाण्यातही परिणाम
कोकणातील तापमान पुढील दोन-तीन दिवस कोरडे राहण्याची शक्यता आहे. दमट हवा, अधिक आर्द्रता आणि तापमानामुळे कोकणात अधिक उष्ण आणि अस्वस्थ वातावरण राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई (Mumbai) आणि ठाण्यात (Thane) देखील परिणाम जाणवण्याचा अंदाज आहे, ज्यात तापमान जरी कमी असलं तरी आर्द्रतेमुळे अधिक तापमान वाटू शकतं.
विदर्भात पाच दिवस अवकाळी पावसाचा अंदाज कायम
तर विदर्भात (Vidarbha) पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा अंदाज कायम आहे. विदर्भात आज (21 एप्रिल) आणि उद्या (22 एप्रिल) काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बुलढाण्यात 60 ते 70 घरांवरील छप्पर उडाले
बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील संग्रामपूर, जळगाव जामोद, शेगाव परिसरात काल दुपारी वादळी वाऱ्यासह तुफान अवकाळी पावसाने हजेरी लावली. जवळपास तीन तास या परिसरात वादळी वाऱ्याने आणि पावसाने धुमाकूळ घातला. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आलेल्या चक्रीवादळाने संग्रामपूर (Sangrampur) गावातील जवळपास 60 ते 70 घरावरील छप्पर उडून गेली. यात मातीचे कौले सुद्धा उडून गेले. त्यामुळे या सर्व नागरिकांना रात्रभर उघड्यावर रात्र काढण्याची वेळ आली. मात्र प्रशासनाने अद्यापही याची दखल घेतली नसल्याने नागरिक संतप्त आहेत. नागरिकांना पावसात रात्रभर उघड्यावर रात्र काढावे लागले. अनेकांची तीन पत्रे एक ते दीड किलोमीटर पर्यंत उडून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.
कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमधील उघड्यावर ठेवलेले धान्य भिजले
वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने नागपूर (Nagpur) शहरातील शेकडो झाडे जमीनदोस्त झाली. त्यामुळे विजेच्या तारा तुटल्याने नागपूरच्या अनेक भागातील बत्ती गुल (Electricity) झाली होती. तर कळमना (Kalamana) कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उघड्यावर ठेवलेले धान्य ओले झाले आहे. त्यामुळे शेतकरी व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. वारंवार येणाऱ्या अवकाळी पावसानंतर कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीचा गलथानपणा परत एकदा पुढे आला आहे.
संबंधित बातमी
Weather : राज्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, शेती पिकांना मोठा फटका, बळीराजा संकटात