मोठी बातमी! टीईटी घोटाळ्यात अपात्र ठरलेल्या राज्यातील शिक्षकांचे पगार ऑगस्ट महिन्यापासून बंद
TET Scam News Updates : अपात्र ठरलेल्या शिक्षकांचा ऑगस्टपासून वेतन बंद करण्याचा निर्णय शिक्षण संचालक कार्यालयाकडून घेण्यात आला आहे.
TET Scam News Updates : टीईटी गैरप्रकारात अपात्र ठरलेल्या राज्यातील शिक्षकांचे (Maharashtra TET Scam) पगार ऑगस्ट महिन्यापासून बंद करण्यात आले आहेत. टीईटी परीक्षा 2019 मध्ये 7 हजार 874 उमेदवारांनी गैरप्रकार केल्याचे निदर्शनास आल्याने या उमेदवारांना अपात्र ठरवले गेले आहे. या गैरप्रकारात अपात्र ठरलेल्या प्राथमिक शाळेच्या 576 आणि माध्यमिक शाळेच्या 447 शिक्षकांचा समावेश आहे. या अपात्र ठरलेल्या शिक्षकांचा ऑगस्टपासून वेतन बंद करण्याचा निर्णय शिक्षण संचालक कार्यालयाकडून घेण्यात आला आहे. या निर्णयामुळं या शिक्षकांना पुढील सप्टेंबर महिन्यात मिळणारा पगार देखील मिळणार नाही.
वेतन बंद करण्याचा निर्णयाबरोबरच या शिक्षकांचे शालार्थ आयडी गोठवण्याच्या सूचना संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या अपात्र यादीतील शिक्षक हे महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित शाळांमध्ये शिक्षक सेवक किंवा सहशिक्षक पदावर कार्यरत असल्याचे आढळून आले आहे. हे शिक्षक अपात्र ठरल्यानंतर सुद्धा शालार्थ प्रणालीद्वारे वेतन अनुदान घेत होते. त्यामुळे या अपात्र शिक्षकांना ऑगस्टपासून वेतनापासून वगळण्यात यावे अशा सूचना शिक्षण संचालकांकडे देण्यात आले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
मागील काही काळात राज्यभरात आरोग्य भरती, पोलीस भरती (Police recruitment) आणि त्यानंतर टीईटी परीक्षा पेपर फुटी प्रकरण (TET Scam) चांगलंच गाजलंय. पुण्यातील सायबर पोलिसांनी (Pune cyber police) आरोग्य विभागाच्या परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा तपास करत असताना, टीईटी परीक्षेतही गैरप्रकार झाल्याचं समोर आलं. या प्रकरणी तपास केल्यानंतर पुणे पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली.
टीईटी घोटाळ्यासंदर्भात पुणे सायबर पोलिसांकडून ओएमआर शीटची कसून तपासणी केली जात आहे. राज्य परीक्षा परिषदेतील 12 अधिकाऱ्यांच्या मदतीनं ही तपासणी केली जात आहे. ओएमआर शीट तपासणीमधून या घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने येत्या काळात या प्रकरणी अनेकांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गैरव्यवहाराची व्याप्ती मोठी
TET परीक्षा उत्तीर्ण करून देण्यासाठी 7 हजार 880 उमेदवारांकडून प्रत्येकी दीड ते दोन लाख रुपये घेण्यात आल्याची शक्यता आहे. त्यामुळे या गैरव्यवहाराची व्याप्ती मोठी असू शकते. 2019 साली झालेल्या टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेत तब्बल 7800 विद्यार्थी बोगस पद्धतीने पात्र ठरल्याचं पुणे सायबर पोलीसांच्या (Pune Cyber Police) तपासात उघड झालं होतं. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेकडून या 7800 बोगस शिक्षकांची नावे जाहीर करण्यात आली असून त्याची यादी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षण अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
TET Scam: सत्तारांच्या मुलीला 2017 पासून आजतागायत मिळतोय पगार, धक्कादायक माहिती आली समोर