Talathi Exam: पहिल्या सत्रात सर्व्हर डाऊन, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित; गोंधळामध्ये तलाठी भरती परीक्षा पार
Maharashtra Talathi exam 2023 live updates: वर्ध्यात प्रशासनाने सांगितलेल्या वेळेत परीक्षा न घेता आधीच घेतल्याने 10 ते 15 विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले.
मुंबई: राज्यात तलाठी भरतीच्या परीक्षेचा गोंधळ सुरूच असल्याचं दिसून आलं. पहिल्यांदा पेपर फुटल्याची घटना घडल्यानंतर आतातरी प्रशासन दक्ष होऊन काम करेल अशी आशा होती. पण आज तलाठी भरती परीक्षेसमोर सर्व्हरचं विघ्न उभं राहिलं. राज्य शासनाच्या वतीनं तलाठी भरतीसाठी घेण्यात येत असलेल्या ऑनलाईन परीक्षेत आज सर्व्हर डाऊन झाल्यानं ठिकठिकाणी गोंधळ उडाला. ऐनवेळी सर्व्हर डाऊन झाल्यानं पहिल्या सत्राची परीक्षा तब्बल दीड तासानं उशिरानं सुरु करण्यात आली. त्यामुळं दुसऱ्या सत्राची ऑनलाईन परीक्षाही लांबणीवर पडल्याचं दिसून आलं. त्यामुळे राज्यातील नागपूरसह अकोला, छत्रपती संभाजीनगर, लातूर आदी अनेक परीक्षा केंद्रावर प्रचंड गोंधळ झाला.
राज्यातल 4 हजार 644 तलाठी पदांसाठी एकूण 10 लाख 41 हजार अर्ज आलेत. त्यासाठी आज परीक्षा घेण्यात येत आहे. त्यामुळे लाखो उमेदवारांची सकाळपासून घालमेल सुरू होती. परीक्षा केंद्रांवर मोठ्या संख्येने उमेदवार प्रवेश पत्र हातात घेऊन उभे होते पण त्यांना वर्गात प्रवेश दिला जात नव्हता. अखेर सर्व्हर पूर्ववत झाला पण परीक्षेचं वेळापत्रक बिघडलं. सकाळीची 9 ची परीक्षा उशिरानं सुरू झाल्यामुळे त्यापुढील दोन परीक्षा दीड तास उशिरानं सुरू होण्याची माहिती देण्यात आली. त्याप्रमाणे दुपारी 12.30 वाजता सुरू होणारी परीक्षा 2 वाजता सुरू झाली. या आधी नाशिकमध्ये तलाठी भरतीच्या परीक्षेत हायटेक कॉपीचा प्रकार उघडकीस आला होता. आता सर्व्हरमधील बिघाड, त्यामुळे यापुढे तरी तलाठी भरती परीक्षा निर्विघ्नपणे पार पडतील का, असा प्रश्न परीक्षार्थी विचारत आहेत.
अकोल्यात विद्यार्थ्यांचा खोळंबा
अकोला जिल्ह्यात तलाठी भरती पेपरच्या वेळी विद्यार्थ्यांचा खोळंबा झाल्याचं दिसून आलं. बाभूळगाव आणि कापशी परिक्षा केंद्रावर सर्व्हर डाऊन झाल्यानं विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. या परीक्षेसाठी अन्य जिल्ह्यांमधून आलेल्या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाल्याचं दिसून आले. काही विद्यार्थी लांबचा प्रवास करून थेट परीक्षा केंद्रावर दाखल झाले होते. सर्व्हर सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
राज्य शासनाच्या वतीनं एखाद्या खाजगी कंपनीला भरमसाठ पैसे मोजून, परीक्षा घेण्यात येतात. पण तरीही ऐनवेळी सर्व्हर डाऊन होणं ही बाब नित्याचीच झाली आहे. राज्य सरकारनं या प्रकाराची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई आणि भविष्यात व्यवस्था करावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.
जालना जिल्ह्यात अनेक विद्यार्थ्यांना मराठवाड्याबाहेरचे सेंटर
तलाठी भरती परीक्षेच्या सर्व्हर डाऊनच्या गोंधळा नंतर पुढे होणाऱ्या परीक्षेच्या नियोजनाबद्दल सुद्धा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका उपस्थित झाली आहे. परीक्षा केंद्रासाठी विद्यार्थ्यांनी दिलेले पर्याय न देता दुसरेच आणि दूरवरचे पर्याय येत असल्याने उमेदवारांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. परीक्षेसाठी फॉर्म भरताना विद्यार्थ्यांना जवळच्या सेंटरचे तीन पर्याय देण्यात आले आहेत. मात्र तिन्ही पैकी एकही पर्याय मिळत नसल्याने परीक्षा समितीने या सेंटर निवडीचे हे ऑप्शन तरी कशासाठी दिले असा प्रश्न विद्यार्थी विचारला आहे. जालना जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांचे मराठवाड्याबाहेर परीक्षा केंद्र आल्याने विद्यार्थ्यांना अधिकचा आर्थिक भूर्दंड यामुळे सहन करावा लागणार आहे.
वर्ध्यात दहा ते पंधरा उमेदवार दुसऱ्या शिफ्टमधील तलाठी परीक्षेपासून वंचित
वर्ध्यात सर्व्हर डाऊन नंतर दुसऱ्या परीक्षेच्या निश्चित वेळेचा उल्लेख नोटीसमध्ये नसल्याने गोंधळ उडाला. वर्ध्यात सर्व्हर डाऊन झाल्याने दुसऱ्या शिफ्टमधील तलाठी परीक्षेचा पेपर उशिरा सुरू झाला, परीक्षा दोन तास उशिरा सुरू होणार असल्याच्या सूचना देणारी नोटीस भिंतीवर लावण्यात आली होती. दोन तास उशिरा पेपर होणार असल्याने परीक्षार्थी केंद्राच्या बाहेर पडले. परंतु दोन तासापूर्वीच परीक्षा सुरू झाल्या. विद्यार्थी सेंटरवर वेळेवर परत आल्यावर परीक्षा सुरू झाली असताना देखील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी परीक्षा केंद्राच्या आत घेतले गेले नाही.
सूचनेत दिलेल्या वेळेआधीच परीक्षा सुरू करण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय. वर्ध्याच्या अग्निहोत्री महाविद्यालय परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडलाय. तब्बल 10 ते 15 परीक्षार्थी दुसऱ्या शिफ्टमधील परीक्षेपासून वंचित राहिले आहेत. या परीक्षार्थींना पुन्हा संधी मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.
धुळ्यात परीक्षेत गोंधळ
धुळे शहरातील भारती मल्टीपर्पज येथे आयोजित करण्यात आलेला तलाठी भरतीचा पेपर तब्बल दीड तास उशिरा सुरू झाला आहे. विद्यार्थ्यांना आता परीक्षा केंद्रावर मध्ये घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सकाळी 9 वाजेची परीक्षेची वेळ देण्यात आली होती. मात्र सर्वर डाऊन असल्याचे कारण पुढे करत ही परीक्षा तब्बल दीड तास उशिरा सुरू झाली आहे.
नागपूरमध्ये सर्व्हर डाऊन
आज सकाळी पहिल्या सत्रासाठीच्या पेपरच्या वेळेला संपूर्ण राज्यभरात ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठीचे सर्व्हर डाऊन झाल्याची माहिती आहे. त्यामुळे नागपूरसह जवळपास सर्वच केंद्रांवर ही परीक्षा सुरू होऊ शकलेली नाही. नागपूरच्या vmv महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर मोठ्या संख्येने विद्यार्थी परीक्षेसाठीच्या प्रवेश पत्र हातात घेऊन उभे होते. मात्र त्यांना वर्ग खोल्यांमध्ये प्रवेश दिला जात नव्हता. काही ठिकाणी परीक्षार्थानी परीक्षेची व्यवस्था आणि सर्वर डाऊन झाल्याबद्दल रोष व्यक्त केला.