Yavatmal News : केवळ रेषा ओढल्या अन् मिळाले 150 पैकी 147 गुण; नवभारत साक्षरता अभियानाचा बट्ट्याबोळ?
Yavatmal News : निरक्षर प्रौढांना साक्षर करण्यासाठी शासनाने नवभारत साक्षरता अभियान सारखे महत्वाकांशी अभियान सुरू केले आहे. मात्र यवतमाळ जिल्ह्यात या अभियानाचा पुरता बट्ट्याबोळ झाल्याचे उघड झाले आहे.
Yavatmal News यवतमाळ : निरक्षर प्रौढांना साक्षर करण्यासाठी शासनाने नवभारत साक्षरता अभियान सारखे महत्वाकांशी अभियान सुरू केले. यासाठी राज्यात अनेक ठिकाणी शैक्षणिक वर्ग देखील सुरू केले. त्या अनुषंगाने गेल्या 17 मार्चला परीक्षा घेण्यात आली होती. या साक्षरता अभियानात यवतमाळच्या (Yavatmal News) अकोला बाजार येथील मीरा पेंदोर या आजीने देखील हिरीरीने सहभाग घेतला अन् परिक्षाही दिली.
या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यात मीरा पेंदोर यांनी चक्क 150 पैकी 147 गुण घेऊन 98 टक्के मिळवत परीक्षा उत्तीर्ण केलीच, शिवाय त्या जिल्ह्यात पहिल्या देखील आल्या. त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. याच कौतुकापोटी 'एबीपी माझा' चे प्रतिनिधी मीरा पेंदोर यांच्या कडे गेले असता, जिल्ह्यात नवभारत साक्षरता अभियानाचा पुरता बट्ट्याबोळ झाल्याचे उघड झाले आहे.
नवभारत साक्षरता अभियानाचा बट्ट्याबोळ?
नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या मीरा पेंदोर यांना या विषयी विचारले असता त्या म्हणाल्या की, या 150 गुणांच्या परीक्षेत मला काहीही येत नव्हतं. मी केवळ रेषा ओढल्या असून काय सोडवले हे मला समजले नसल्याचे त्यांनी सांगितले. मी जात नव्हती पण नाव आले म्हणून मी त्या ठिकाणी गेले. नाव कुठून आले हेही मला माहीत नव्हतं. म्हाताऱ्या माणसाला याबाबत काय समजतं. आम्ही कधी शिकलोच नाही तर पेपरही कधी वाचता आला नसल्याचे मीरा पेंदोर म्हणाल्या.
तसेच या अभियानात मला कोणीच काही शिकवले नसल्याचेही त्यांनी सांगितलं. त्यामुळे मीरा पेंदोर यांचे एक उदाहरण पुढे आले असले तरी उर्वरित ठिकाणी देखील असाच काहीसा प्रकार तर सुरू नाही ना, ही शंकाही निर्माण झाली आहे. तर राज्यात नवभारत साक्षरता अभियान हा केवळ कागदावर की वास्तवात? असाही प्रश्न उपस्थित केला जातोय.
पेपरमध्ये काय लिहले हे देवाला ठाऊक- मीरा पेंदोर
यावेळी पुढे बोलताना मीरा पेंदोर यांनी सांगितले की, परीक्षेचा पेपर मी दिला. पण त्यात काय लिहले हे देवाला ठाऊक आणि त्या पेपरला ठाऊक असा निर्वाळाही मीरा पेंदोर या अजीने दिला. निरक्षर प्रौढांसाठी राबवलेलं हे चांगले अभियान शासनाने जर योग्य पद्धतीने राबवलं असतं तर त्या प्रौढांनाही साक्षर होण्याची संधी मिळाली असती. मात्र केवळ उपक्रम राबवून निरक्षरांना परीक्षेला बसवने आणि उपक्रम पार पाडणे हाच हेतू यातून दिसून येत आहे. त्यामुळे नवसाक्षर अभियान हे वास्तवात राबविण्यात येत आहे की कागदावरच, असाही प्रश्न आता उपस्थित केल्या जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI