(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाचा मुहूर्त अखेर ठरला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट सांगितलं...
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाचं काम अंतिम टप्प्यात असल्याचं बोललं जातं आहे. मात्र हा महामार्ग कधी सुरु होणार हा सवाल आता नागरिक करु लागले आहेत. याचं उत्तर मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलं आहे.
Maharashtra Samruddhi Mahamarg : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचं काम अंतिम टप्प्यात असल्याचं बोललं जातं आहे. मात्र हा महामार्ग कधी सुरु होणार हा सवाल आता नागरिक करु लागले आहेत. याचं उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. नागपूर- शिर्डी समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) 15 ऑगस्टला सुरु होणार असं त्यांनी सांगितलं आहे. शनिवारी कुर्ल्यात मंगेश कुडाळकर यांनी आयोजित केलेल्या एका सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. याआधी महाविकास आघाडी सरकारच्या काळात समृद्धी महामार्गाचं उद्घाटन दोन ते तीन वेळा लांबणीवर टाकण्यात आलं होतं.
महामार्गामुळं लोकांची समृद्धी होईल, शेतकरी आत्महत्या करणार नाही
समृद्धी महामार्ग वाहनांसाठी लवकरच खुला होणार आहे. या प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलं असून 15 ऑगस्ट रोजी नागपूर-शिर्डी समृद्धी महामार्ग चालू करणार असल्याचं त्यांनी म्हटलं. काही दिवसांपूर्वी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं होतं की, समृद्धी महामार्ग गेम चेंजर आहे. या महामार्गाला बाळासाहेबांचं नाव दिलं आहे. ही फडणवीसांची योजना होती. त्यांनी मला जबाबदारी दिली, मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय . या महामार्गामुळं लोकांची समृद्धी होईल, शेतकरी आत्महत्या करणार नाही, असंही शिंदे यांनी म्हटलं होतं.
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचं काम अंतिम टप्प्यात असल्याचं बोललं जातं आहे. सरकारकडून वारंवार हा महामार्ग सुरू करण्यासंबंधी तारखाही घोषित करण्यात आल्या आहेत. यापूर्वीच्या सरकारकडून ऑक्टोबर 2021, 31 डिसेंबर 2021 आणि आता 31 मार्च 2022 ही तारीख देण्यात आली होती. पण अजूनही समृद्धी महामार्गाचं काम अपूर्ण असल्याची माहिती आहे.
समृद्धीसाठी तारीख पे तारीख
नागपूर (Nagpur)-मुंबई (Mumbai) दरम्यान रहदारी सुलभ व्हावी या उद्देशानं 31 जुलै 2015 रोजी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी 701 किलोमीटरच्या 'समृद्धी महामार्गाची' घोषणा विधानसभेत केली. प्रत्यक्षात राज्याच्या 10 जिल्ह्यातून जरी हा महामार्ग जात असला तरी एकूण 24 जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे. या महामार्गाच्या बांधकामाच्या सुरुवातीला अनेक अडचणी आल्यात आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. त्यावेळी हा महामार्ग पूर्ण सुरू होण्याची प्रस्तावित तारीख ही ऑक्टोबर 2021 अशी ठरविण्यात आली होती. पण मध्यंतरी जमीन अधिग्रहण, कोरोनामुळे लॉकडाऊन अशा अनेक अडचणींना सामोरं जात सरकारनं हा महामार्ग जवळपास पूर्णत्वाला नेला आहे. मात्र समृद्धी महामार्ग सुरू करण्यासंबंधी सरकारनं अनेकदा तारीख घोषित केली, गेल्या वर्षी 31 डिसेंबर ही तारीख देण्यात आली होती.
त्यानंतर अनेक ठिकाणी कामं अपूर्ण असल्यानं 31 मार्च 2022 पर्यंत नागपूर शिर्डी हा पहिला टप्पा सुरू करणार असं गेल्या सरकारकडून सांगण्यात आलं होतं. पण अजूनही समृद्धी महामार्गाचं काम सुरुच आहे. वारंवार सरकारकडून तारखा जाहीर झाल्यावरही समृद्धी महमार्ग का सुरू होऊ शकत नाही? असा प्रश्न आता उपस्थित राहत आहे.
एकूण 16 टप्प्यांत या महामार्गाचं बांधकाम सुरू असून एकंदरीत नागपूर मुंबई या 701 किलोमीटरच्या महमार्गात एकूण 1699 ठिकाणी छोटी मोठी बांधकामं असून यातील जवळपास 1400 च्यावर बांधकामं पूर्ण झाली असून उरलेली बांधकामं अजून तरी जवळपास एक वर्षांचा कालावधी घेतील, अशी माहिती मिळाली आहे.