Rain : आज कोकणात पावसाचा रेड तर पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट; वाचा हवामान विभागाचा अंदाज
Maharashtra Rain : राज्याच्या विविध भागात पावसानं जोरदार हजेरी लावल्याचं चित्र आहे.
Maharashtra Rain : राज्याच्या विविध भागात पावसानं जोरदार हजेरी लावल्याचं चित्र आहे. मुंबईसह उपनगारत मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं तिथं सखोल भागात पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम होत आहे. दरम्यान, राज्यातील अनेक ठिकाणी पावसाची प्रतीक्षा कायम आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आज कोकणात पावसाचा रेड तर पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट
हवामान विभागानं पुढील तीन ते चार दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळं नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. आज राज्यातील रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच विदर्भातील वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर मराठवाड्यातील काही जिल्हे आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस
राज्याच्या काही भागात पावसानं (Rain) जोरदार हजेरी लावली आहे. कोकणासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळं बळीराजा आनंदी झाला आहे. शेतकरी पावसाची वाट बघत होतो. पावसामुळं शेतकऱ्यांची काम खोळंबली होती. आता शेती कामांना वेग येणार आहे. राज्यातील धुळे, हिंगोली, परभणी, मुंबई या ठिकाणी जोरदार पाऊस झाला. त्याचबरोबर कोकणातील जिल्ह्यातही जोरदार पाऊस सुरु आहे. हिंगोली जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पावसाने हजेरी लावली. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. वसमत तालुक्यातील आकोली वसमत रोडवर आसलेल्या ओढ्याला या पावसामुळे पूर आला होता. तर पुरात अडकलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांना नागरिकांनी मानवी साखळी करत बाहेर काढले. यावर्षीच्या मोसमातील हा सर्वात पहिला मोठा पाऊस समाजाला जातोय. गेल्या एक महिन्यापासून शेतकरी या पावसाची वाट पाहत होते. आज अखेर जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात आनंद व्यक्त केला जातोय.