Maharashtra rain : राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस, बळीराजा आनंदी; शेती कामांना येणार वेग
Maharashtra rain : राज्याच्या काही भागात पावसानं (Rain) जोरदार हजेरी लावली आहे. कोकणासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे.
Maharashtra rain : राज्याच्या काही भागात पावसानं (Rain) जोरदार हजेरी लावली आहे. कोकणासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळं बळीराजा आनंदी झाला आहे. शेतकरी पावसाची वाट बघत होतो. पावसामुळं शेतकऱ्यांची काम खोळंबली होती. आता शेती कामांना वेग येणार आहे. राज्यातील धुळे, हिंगोली, परभणी, मुंबई या ठिकाणी जोरदार पाऊस झाला. त्याचबरोबर कोकणातील जिल्ह्यातही जोरदार पाऊस सुरु आहे.
धुळे जिल्ह्यात जोरदार पाऊस
धुळे जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली. साक्री शहरात धुवाधार पाऊस झाला. पावसामुळं शेतकऱ्यांना मोठा आनंद झाला आहे. विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस झाला.पावसामुळे महावितरणची बत्ती गुल झाली आहे. अनेक ठिकाणी विजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे.
परभणी जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस
परभणी जिल्ह्यातील काही भागात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पावसाने हजेरी लावली. दिवसभर प्रचंड उकाडा जाणवल्यानंतर सायंकाळच्या सुमारास पाथरी, जिंतूर, मानवत, गंगाखेड तालुक्यात जोरदार पाऊस झाला. या जोरदार पावसानं काही ठिकाणी ओढ्याला पुर आला आहे. पाथरी-गुंज रस्त्यावरील ओढ्यालाही पुर आल्याने जवळपास 2 तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पाऊस थांबल्यानंतर पाणी ओसरले तेव्हा या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली. दरम्यान सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
अकोल्यात जोरदार पाऊस
अकोल्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या अकोलेकरांना दिलासा मिळाला आहे. पावसामुळं अशोक वाटिका चौकात अटल बिहारी वाजपेयी उड्डाण पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. यामुळं वाहनधारकांची मोठी तारांबळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालंय.
हिंगोली जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस
हिंगोली जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पावसाने हजेरी लावली. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. वसमत तालुक्यातील आकोली वसमत रोडवर आसलेल्या ओढ्याला या पावसामुळे पूर आला होता. तर पुरात अडकलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांना नागरिकांनी मानवी साखळी करत बाहेर काढले. यावर्षीच्या मोसमातील हा सर्वात पहिला मोठा पाऊस समाजाला जातोय. गेल्या एक महिन्यापासून शेतकरी या पावसाची वाट पाहत होते. आज अखेर जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात आनंद व्यक्त केला जातोय.