Maharashtra Rain Update : गुडन्यूज! पुढच्या दोन-तीन दिवसांत मान्सून कोकणात; मुंबईत कधी?
Maharashtra Rain Update : एरवी 7 जूनला महाराष्ट्रात दाखल होणारा मान्सून यावर्षी तीन-चार दिवस आधीच कोकणात दाखल होण्याची शक्यता आहे.
Maharashtra Rain Update : वेळेआधीच केरळमध्ये दाखल झालेला मान्सून पुढच्या दोन दिवसांत कोकणात दाखल होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. एरवी 7 जूनला महाराष्ट्रात दाखल होणारा मान्सून यावर्षी तीन-चार दिवस आधीच कोकणात दाखल होण्याची शक्यता आहे. केरळपासून नंतर कर्नाटकपर्यंत पोहोचलेल्या मान्सूनच्या पुढच्या प्रवासासाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे दोन दिवसांत तो गोवा आणि दक्षिण कोकणात दाखल होऊ शकतो, असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. असं असलं तरी मुंबईकरांना मात्र आणखी आठवडाभर मान्सूनची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मान्सून 10 जूननंतरच मुंबईत येईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
देशाच्या बहुतांश भागात चांगला पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं आधीच व्यक्त केला आहे. यंदा 106 टक्के पाऊस यंदा अपेक्षित आहे, तर उत्तर-पूर्व भागात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडू शकतो. IMD ने 29 मे रोजी जाहीर केले होते की नैऋत्य मान्सून 1 जून रोजी नियोजित वेळेच्या तीन दिवस आधी रविवारी केरळमध्ये पोहोचला आहे.
हवामान तज्ञ के एस होसाळीकर यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, नैऋत्य मान्सून मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात आहे. कर्नाटकचा आणखी काही भाग, कोकण-गोव्याचा काही भाग, तामिळनाडूचा आणखी काही भाग, नैऋत्य बंगालच्या उपसागराचा उर्वरित भाग, प.म. बंगालचा उपसागर, ई. बंगालचा उपसागर, ईशान्येमधील राज्ये, सिक्कीममध्ये पुढील 2 दिवसांत जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे
नैऋत्य मान्सून मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, कर्नाटकचा आणखी काही भाग,कोकण-गोव्याचा काही भाग, तामिळनाडूचा आणखी काही भाग,नैऋत्य बंगालच्या उपसागराचा उर्वरित भाग,प.म. बंगालचा उपसागर,ई. बंगालचा उपसागर, ईशान्य राज्ये,SHWB,सिक्कीम पुढील 2 दिवसांत जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 1, 2022
देशात या मान्सून हंगामात आधीच्या अंदाजापेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (IMD) महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितलं आहे की, या मान्सून हंगामातील सरासरी पाऊस दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या 103 टक्के असण्याची शक्यता आहे." IMD ने एप्रिलमध्ये सांगितले होते की देशात सामान्य पाऊस पडेल जो दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या 99 टक्के असेल, असं त्यांनी सांगितलं आहे.