Maharashtra Rain : राज्यात औरंगाबादसह जालन्यात पावसाची हजेरी, आज विदर्भात पावसाचा यलो अलर्ट
Maharashtra Rain : राज्यात काही ठिकाणी पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. आजही राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Maharashtra Rain : राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. मात्र, राज्यात काही ठिकाणी पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई परिसरात चांगलाच पाऊस झाला आहे. त्याचबरोबर औरंगाबाद जिल्ह्यातही दुपारपासून अनेक ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. तसेच जालना जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. अंबड तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्यानं झाडे उन्मळून पडली आहेत. दरम्यान, आज विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पालघर, नाशिकचा घाट भाग, अहमदनगर, रायगड या जिल्ह्यातही पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
दरम्यान, रात्रीपासूनच मुंबईसह परिसरात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. पावसाचा कमी झालेला जोर पुन्हा वाढला आहे. त्याचबरोबर नाशिक (Nahsik) जिल्ह्यातही पावसानं धुमाकूळ घातला आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तसेच गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातही चांगला पाऊस झाला आहे.
यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय?
यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय असा प्रश्न सगळ्यांना पडला असेल. तर या यलो अलर्टमध्ये हवामान खात्यानं हलक्या पावसाची शक्यता वर्तवलेली असते. तसेच यलो अलर्ट हा सावध राहण्यासाठी दिला जातो. हा इशारा वॉचसाठी दिलेला असतो. जेव्हा हवामानात बदल होतो तेव्हा हा अलर्ट दिला जातो. तुम्हाला तत्काळ धोका नाही. परंतु, हवामानाची स्थिती पाहता, तुम्ही ठिकाण आणि तुमच्या प्रवासाची काळजी घेतली पाहिजे, असे या अलर्टचा अर्थ आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
औरंगाबाद जिल्ह्यात कालपासूनच अनेक ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यात गारांचा पाऊस झाला आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसला आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसापासून औरंगाबाद जिल्ह्यात पावसानं उघडीप दिली होती. मात्र, पुन्हा पावसानं चांगली हजेरी लावली आहे.
जालना जिल्ह्यातही पावसाची हजेरी
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळं झाडे उन्मळून पडली आहेत. वडीगोद्री परिसरात झाडे पडली असून घरावरील छप्पर देखील उडाले आहे. तसेच काही ठिकाणी घरावरील पत्रे देखील उडाले आहेत. दरम्यान बऱ्याच दिवसानंतर ओढ दिलेल्या पावसाने अचानक हजेरी लावल्याने खरीप पिकांना जीवनदान मिळालं आहे.
सप्टेंबर महिन्यात चांगल्या पावसाची शक्यता
सध्या देशाच्या विविध भागात जोरदार पाऊस पडत आहे. तर काही ठिकाणी पावसाळा सुरु होऊन तीन महिने झाले तरी अद्यापही चांगल्या पावसाची प्रतिक्षा कायम आहे. दरम्यान, सप्टेंबर महिन्यात देशात चांगला पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं (India Meteorological Department) वर्तवला आहे. त्यामुळं मान्सून यावर्षी देखील लवकर परतीचा प्रवास करणार नसल्याची माहिती भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा ( Mrutyunjay Mohapatra) यांनी दिली. नैऋत्य मान्सून लवकर माघार परतीचा प्रवास करणार असल्याचा मागील आठवड्यातील अंदाज महापात्रा यांनी फेटाळून लावला आहे. या महिन्यात पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज त्यांनी वर्तवलाय.