व्हायरल व्हिडीओ प्रकरणी मुख्य आरोपी प्रकाश सुर्वे यांचे पुत्र राज सुर्वे, युवासेनेचे वरुण सरदेसाई यांचा मोठा दावा
Sheetal Mhatre : शीतल म्हात्रेंचा व्हिडीओ मॉर्फ केलेला असेल तर खरा व्हिडिओ कुठे आहे असा सवाल वरुण सरदेसाई यांनी केला आहे.
Sheetal Mhatre Viral Video : शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) व्हायरल व्हिडीओ प्रकरणात वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी मोठा दावा केला आहे. प्रकाश सुर्वे यांचे चिरंजीव राज सुर्वे यांनी तो संपूर्ण व्हिडिओ फेसबुक लाईव्ह केला होता. त्यामुळे खरा आरोपी आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे असून या प्रकरणी राज सुर्वेंना अटक व्हायला पाहिजे, अशी मागणी सरदेसाई यांनी केली आहे. तसेच शीतल म्हात्रेंचा व्हिडीओ मॉर्फ केलेला असेल तर खरा व्हिडीओ कुठे आहे असा सवाल त्यांनी केला आहे.
मुंबई पोलीस सक्षम आहेत. ते खऱ्या आरोपीला अटक करतील. कारण हा व्हिडीओ आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलानेच बनवल्याचा दावा ही सरदेसाई यांनी केला आहे. जे नेते आणि कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम आहे. त्यांच्यावर रोज आरोप होत आहेत, कारवाया केल्या जात आहेत. सध्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून फक्त विरोधी पक्षाच्या नेत्यांवर कारवाया होत आहेत. मात्र ते नेते भाजपमध्ये गेले, त्यांच्यावरील कारवाया थांबतात. जनता हे सगळं पाहत आहे. जनतेला हे रुचलेलं नाही आणि त्यामुळेच ठिकठिकाणी भाजपचे स्वतःच्या गडामध्येच पराभव होत असल्याचे सरदेसाई म्हणाले.
ज्या पद्धतीने भाजपचा ठिकठिकाणी पराभव होत आहे. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ही काय होईल हे सुस्पष्ट असल्याचे सरदेसाई म्हणाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात गेले अनेक वर्ष एका विशिष्ट विचारसरणीचा कब्जा आहे. आम्ही कधीही येथील सिनेट निवडणुकीला गांभीर्याने घेतले नाही. मात्र, आता आम्ही सिनेटच्या दहा जागांपैकी तीन जागांवर लढवत आहोत. त्या तीन जागा आणि उर्वरित सर्व जागा महाविकास आघाडी जिंकेल असा विश्वास असल्याचेही सरदेसाई म्हणाले. काल शिंदे गटात झालेला भूषण देसाई यांच्या पक्षप्रवेशासंदर्भात आमचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी त्यांचं म्हणणं मांडलेले आहे. त्यामुळे त्याबद्दल मी बोलणे योग्य नसल्याचे वरुण सरदेसाई म्हणाले.
काय आहे प्रकरण?
गोरेगाव इथे शनिवारी (11 मार्च) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅली शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे सहभागी झाले होते. या रॅलीमध्ये शीतल म्हात्रे या जीपमध्ये असताना त्यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ हा मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आला. बदनामी करण्यासाठी हा व्हिडीओ मॉर्फ करुन ठाकरे गट आणि युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तो व्हायरल केल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला. या प्रकरणी शीतल म्हात्रे यांनी रविवारी पहाटे दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.