Maharashtra Politics Shivsena: ...म्हणून चिन्ह आणि पक्ष दोन्ही लांब गेले; दीपक केसरकरांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल
Maharashtra Politics Shivsena: निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर केलेल्या टीकेला दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
Maharashtra Politics Shivsena: शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवल्यानंतर आणि पक्षाचं नाव वापरण्यावरही निवडणूक आयोगानं मनाई केल्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर केलेल्या टीकेला शिंदे गटाचे प्रवक्ते आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर प्रत्युत्तर दिले आहे. बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्वाच्या विचारापासून लांब गेलात म्हणून आपले चिन्ह गेले, पक्ष तुमच्यापासून लांब गेला याची जाणीव आदित्य ठाकरेंनी ठेवावी असा हल्लाबोल दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरेंवर केला आहे.
दीपक केसरकर म्हणाले की, लोकांची खोटी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरे करत आहेत. हे जनतेला कदापिही मान्य होणार नाही. जनतेला विकास हवा असून अडीच वर्षाच्या कालावधीत काय विकास केला याचा लेखाजोखा तुम्ही मांडू शकत नसल्याची टीकाही केसरकर यांनी केली. सत्ताकाळात आलेल्या लोकांना न भेटणे, वाईट शब्दांमध्ये बोलणे, लोकांची कामे न करणे, या सगळ्या वागण्याचे लोकांनी तुम्हाला प्रायश्चित्त दिलं असल्याची बोचरी टीका केसरकरांनी केली आहे.
आदित्य ठाकरे यांची शिंदे गटावर हल्लाबोल
निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आणि नाव गोठवल्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त करत शिंदे गटावर टीका केली. 'खोकेवाल्या गद्दारांनी आज शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केला आहे. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही. लढणार आणि जिंकणारच! आम्ही सत्याच्या बाजूने ! सत्यमेव जयते! असे आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले.
खोकेवाल्या गद्दारांनी आज शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केला आहे. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 8, 2022
लढणार आणि जिंकणारच!
आम्ही सत्याच्या बाजूने!
सत्यमेव जयते! pic.twitter.com/MSBoLR9UT5
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेना नेते, शिवसैनिकांमध्ये प्रतिक्रिया उमटू लागली. त्याचे पडसाद सोशल मीडियावरही दिसले. आमचे चिन्ह उद्धव बाळासाहेब ठाकरे असे म्हणत शिवसैनिकांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- 'धनुष्यबाण' चिन्ह आणि 'शिवसेना' नाव कधीपर्यंत गोठवलं?; निवडणूक आयोगाच्या निर्णयातील महत्वाचे 10 मुद्दे
- Maharashtra Politics Uddhav Thackeray: शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवलं; उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले...