Supriya Sule : स्वबळावर सत्ता शक्य, पण राष्ट्रवादीचा विरोधक कोण? सुप्रिया सुळेंनी स्पष्ट सांगितले
Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेस हा 2024 मध्ये स्वबळावर सत्ता स्थापन करू शकतो असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. मात्र, राष्ट्रवादीचा शत्रू कोण, हे देखील त्यांनी स्पष्ट केले.

Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यात एकहाती सत्ता येऊ शकते. पण, राष्ट्रवादीचा विरोधक हा पक्षांतर्गत गटबाजी असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आज मुंबई यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका मांडली. आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, सत्ता गेली याचे नैराश्य जास्त नाही आले. शरद पवार यांच्या 55 वर्षांच्या कारकिर्दीचा इतिहास पाहिला तर यातील 25 वर्षे ही सत्तेत होती आणि 30 वर्षे ही विरोधात होती. त्यातही प्रसिद्धीही विरोधी पक्षात असताना अधिक झाली आहे. महाराष्ट्राने शरद पवार यांना विरोधात असतानाही प्रेम दिलं आहे. वर्ष 2014 मध्ये लोकांनी नापसंती दर्शवली आणि आपला पराभव झाला.अनेक लोक आपल्याला सोडून गेले. सध्या सत्ताधाऱ्यांमधील 105 पैकी 50 जण त्यांचे आहेत. मात्र, उर्वरित सगळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातील आहेत असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
पक्षाचा विरोधक म्हणजे पक्षांतर्गत गटबाजी
शून्यातून आपण पुन्हा उभे राहू आणि पूर्ण ताकदीने पक्ष संघटना उभी करू असा विश्वासही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. कितीही मोठी ताकद आली तरी महाराष्ट्र नेस्तनाबूत होऊ शकणार नाही. मविआ सरकारमध्ये मंत्रिपद असताना आपल्या पक्षाच्या प्रत्येक नेत्याने प्रामाणिकपणे अभिमानास्पद काम केले, असे कौतुकोद्गार सुप्रिया सुळे यांनी काढले. पक्षाची पुढील निवडणुकीत एकहाती सत्ता येऊ शकते पण राष्ट्रवादीचा विरोधक हा पक्षांतर्गत गटबाजी हाच आहे. त्यामुळे अजित पवार आणि जयंत पाटील यांनी मिळून राज्याचा दौरा करावा, अशी विनंती करताना पक्षाची एकहाती सत्ता येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही आणि 2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा नंबर एकचा पक्ष होईल, असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.
शरद पवार यांच्याकडून शिकावे
एका सर्वेक्षणानुसार 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 12 आणि काँग्रेस पक्षाला 8 अशा मिळून 20 जागा मिळणार होत्या. मात्र, शरद पवार यांनी 2019 च्या निवडणुकीत आपल्या भाषणाची शैली बदलली आणि ही संख्या 54 वर गेली. संपूर्ण महाराष्ट्र शरद पवार यांच्या मागे उभा राहिला. राज्यातील युवकाने साहेबांवर विश्वास ठेवला, असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले. आता सत्ता गेल्यानंतर शरद पवार यांना विचारलं पुढे काय तर ते म्हणाले की उद्यापासून मी गाडी काढणार आणि राज्यातील शेवटच्या युवकापर्यंत जाणार आणि पक्षाला पुन्हा उभारी देणार. आपण घेतलेल्या निर्णयावर ठाम राहायचे हे शरद पवार यांनी सांगितले असल्याचे सुप्रिया सुळेंनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
