Devendra Fadnavis: हिंदीत मुलाखती...पवारांवर निशाणा...राज्यपालांची भेट अन् आता दिल्ली वारी; फडणवीसांच्या मनात चाललंय काय?
Devendra Fadnavis: मागील काही तासांत घडलेल्या काही घडामोडींमुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा चर्चेत आले आहेत.
Devendra Fadnavis: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मनात नेमकं काय चाललंय, असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. मागील काही तासांत देवेंद्र फडणवीस यांनी दोन वाहिन्यांना हिंदीत मुलाखती दिल्या. या मुलाखतींमध्ये फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला. त्यानंतर फडणवीस आता मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह दिल्ली दौऱ्यावर निघाले आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील काही तासात एका खासगी वृत्तवाहिनीला आणि दूरदर्शनला हिंदीमध्ये मुलाखत दिली. या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. 2019 मधील भाजप-राष्ट्रवादीच्या सरकारसाठी पवारांची संमती होती. मात्र, त्यांनी डबलगेम केला असल्याचा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला. त्याशिवाय, त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर ही टीकास्त्र सोडले.
राज्यपालांची घेतली भेट
दिवसभर मुलाखतीची चर्चा सुरू असताना दुसरीकडे फडणवीस यांनी दुपारी राज्यपाल रमेश बैस यांचीदेखील भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यपालांसोबत कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली, याचा तपशील समोर आला नाही. राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनुषंगाने ही चर्चा असावी असे म्हटले जात आहे. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारासाठीची बैठक मुख्यमंत्र्यांसोबत झाली असती, असेही म्हटले जात आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात संधी?
बुधवारी संध्याकाळी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पंतप्रधान मोदी यांच्या निवास स्थानी पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शाह, संघटन महासचिव बीएल संतोष आदी नेते या बैठकीत उपस्थित होते. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबद्दल चर्चा झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदे गटातील खासदारांना संधी मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. तर, दुसरीकडे फडणवीस यांनी हिंदीत मुलाखत देणे आणि मागील काही प्रकरणांवर स्पष्टीकरण देणे, या क्रोनोलॉजीकडे राजकीय विश्लेषक लक्ष वेधत आहेत. त्यामुळे फडणवीस राज्याच्या राजकारणाऐवजी थेट दिल्लीत राजकारणात प्रवेश करणार का, याचीही पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही एकत्रितपणे दिल्ली दौऱ्यावर निघाले आहेत. दिल्लीत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. ही भेट केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या अनुषंगाने आहे की राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या अनुषंगाने याबाबत अद्याप काही स्पष्ट झाले नाही.