Maharashtra Politicis : अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक, मविआच्या महिला शिष्टमंडळानं घेतली राज्यपालांची भेट
मविआच्या महिला शिष्टमंडळानं (womens delegation) आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेऊन, कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे.
Maharashtra Politicis : महाविकास आघाडीच्या महिला शिष्टमंडळानं (womens delegation) आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेऊन, कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. विरोधकांकडून सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. अशातच आता महाविकास आघाडीच्या महिला शिष्टमंडळानं देखील त्यांची राजीनाम्याची मागणी करत त्यांच्यावर टीका केली आहे.
आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन आम्ही अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याची माहिती शिवसनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी सांगितली. यावेळी महाविकास आघाडीच्या महिला शिष्टमंडळानं राज्यपाल कोश्यारी यांनी निवेदन दिलं आहे. हे सरकार बेकायदेशी असल्याचे कायंदे यावेळी म्हणाल्या. आठ वेळा संसदरत्न पुरस्कार मिळवणाऱ्या सुप्रिया सुळे यांच्याबद्दल असे चुकीचं वक्तव्य करणं योग्य नसल्याचे कायंदे म्हणाल्या. सत्तारांच्या वक्तव्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातील महिला संतापल्या आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री समज देतो म्हणत आहेत, पण सत्तार समज देण्याच्या पलीकडे गेले असल्याचे कायंदे म्हणाल्या.
अब्दुल सत्तारांसह मंत्री रविंद्र चव्हाण, मंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरोधात निवेदन
आत्तापर्यंत अब्दुल सत्तारांचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता. मात्र, घेतला नाही. त्यामुळं राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून तरी मला अपेक्षा असल्याचे कायंदे म्हणाल्या. तसेच धमकवणाऱ्या मंत्र्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणीही कायंदे यांनी केली. यावेळी अब्दुल सत्तारांसह मंत्री रविंद्र चव्हाण, मंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरोधात निवेदन दिले आहे. दरम्यान, मंत्रीमंडळात महिलांना स्थान न देण्याच्या मुद्यावरुन देखील कायंदे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतला होता. तसा राजीनामा हे सरकार घेणार का? असा सवालही कायंदे यांनी यावेळी केला.
शिंदे सरकारडे थोडी जर नैतिकता असेल तर....
राज्याच्या मंत्रीमंडळातील मंत्री जर महिलांचा अपमान करणार असतील तर अशा मंत्र्यांची हकालपट्टी केली पाहिजे. शिंदे सरकारडे थोडी जर नैतिकता असेल तर पुढच्या 24 तासात अब्दुल सत्तारांसह मंत्री रविंद्र चव्हाण, मंत्री गुलाबराव पाटील यांचे राजीनामे घ्यावेत असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी केलं. चुकीची वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना मंत्रीपदाच्या खुर्चीवर राहण्याचा अधिकार नसल्याचे चव्हाण यावेळी म्हणाल्या. महाराष्ट्रातील महिला गप्प बसणार नाही. राज्यातील महिला ही सावित्रीची लेक असल्याचे चव्हाण यावेळी म्हणाल्या.
महत्त्वाच्या बातम्या: