शिवसेना आमदार 'एअरलिफ्ट', पुढचा मुक्काम गुवाहाटीत; शिंदे नवा गट स्थापन करणार? रात्रभरात काय-काय घडलं?
Maharashtra Political Crisis : विशेष विमानानं एकनाथ शिंदेंचा गट सूरतहून गुवाहाटीत. 40 आमदार सोबत असल्याची एकनाथ शिंदेंचा दावा, रॅडिसन हॉटेलात सेना आमदारांचा मुक्काम
Maharashtra Political Crisis : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळं राज्याच्या राजकारणात भूकंप आला असून महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) सरकारचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. काल शिवसेनेतील प्रबळ नेते आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आपल्या गटातील आमदारांसह नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आणि शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला अन् शिवसेनेत वादळ आलं. एकनाथ शिंदे आणि आमदारांनी सूरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये मुक्काम ठोकला. शिवसेनेकडून शिंदेंची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं एकनाथ शिंदेंच्या वतींन सांगण्यात आलं. यासर्व प्रकारात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्याचं पाहायला मिळालं. एकनाथ शिंदेंसोबतच्या काही आमदारांनी आपल्याला दमदाटी करुन, धमक्या देऊन सूरतमध्ये नेल्याचं सांगितलं. काहींनी मातोश्रीवर निरोप धाडले तर काहींनी एकनाथ शिंदेंच्या हातावर तुरी देत चक्क मुंबई गाठली. यासर्व घडामोडींमध्ये कालचा दिवस मावळला. पण घडामोडी काही थांबल्या नाहीत. राज्याच्या राजकारणात यापूर्वी महाराष्ट्रानं न पाहिलेल्या अनेक घडामोडी रात्रभर घडत होत्या.
शिवसेनेचे प्रबळ नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आणि संबंध महाराष्ट्र हादरला. सूरतमध्ये आपल्या आमदारांसह एकनाथ शिंदेंनी भाजप नेत्यांशी भेटीगाठी घेतल्या. त्यानंतर शिवसेनेकडून मन वळवण्याचा प्रयत्न सुरु झाला. पण एकनाथ शिंदेंनी आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर सूरतमधून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांना एअरलिफ्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला.
राज्यातील राजकीय भूकंपाचं केंद्र सूरतमधून गुवाहाटीकडे
महाराष्ट्राच्या राजकीय भूकंपाचं केंद्र आता सूरतमधून आसाममधल्या गुवाहाटीकडे पोहोचलं. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे त्यांच्या समर्थक आमदारांसह आज सकाळी गुवाहाटीमध्ये पोहोचले. काल दिवसभराच्या नाट्यमय घडामोडीनंतर शिंदे गटाच्या आमदारांना विशेष विमानानं सूरतहून गुवाहाटीकडे नेण्यात आलं. गुवाहाटीमध्ये पोहोचताच एकनाथ शिंदे बंडानंतर पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आले. आपल्याबरोबर 40 आमदार असल्याचा दावा करून शिंदे यांनी शिवसेनेला आव्हान दिलं. तसेच, बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व पुढे नेत असल्याचं सांगत त्यांनी भाजपबरोबर जाणार असल्याचे स्पष्ट संकेतही दिले आहेत. सूरतमध्ये भाजपचे मोहीत कंबोज हे एकनाथ शिंदेच्या समर्थक आमदारांसोबत सावलीसारखे वावरत होते. एवढंच नाहीतर सूरतपासून गुवाहाटीपर्यंत या आमदारांसोबत देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय असलेले भाजपचे मोठे नेते उपस्थित असल्याची माहितीही मिळत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे शिवधनुष्याची साथ सोडत भाजपचं कमळ हाती तर घेणार नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. परंतु, आम्ही शिवसेना सोडली नाही आणि सोडणारही नाही, असा दावा एकनाथ शिंदे वारंवार करत आहेत. अशातच सूरतहून गुवाहाटीला गेलेल्या या सर्व आमदारांचा मुक्काम आता गुवाहाटीतील रॅडिसन हॉटेलमध्ये झाला आहे. त्यामुळे आज संपूर्ण राज्याचं लक्ष गुवाहाटीच्या रॅडिसन हॉटेलकडे असणार आहे.
पाहा व्हिडीओ : Eknath Shinde एकनाथ शिंदेंसह शिवसेना आणि अपक्ष आमदारांना केलं Airlift, चार्टर विमानाची Exclusive दृश्य
एकनाथ शिंदे नवा गट स्थापन करणार?
एकनाथ शिंदेंची पुढची भूमिका काय असणार हा प्रश्न संपूर्ण राज्याला पडला आहे. शिवसेनेसाठी सध्याचा काळ अत्यंत कठीण असल्याचं मत अनेक राजकीय विश्लेषकांनी केलं आहे. अशातच, बंडं केलं नाही असा दावा करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी नवा गट स्थापन करण्यासाठी हालचाली केल्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदेंना पाहिजे असलेला 37 आमदारांचा कोटा पुर्ण झाल्याची माहिती आहे. आणि त्यामुळे शिंदेंसोबत असलेल्या आमदारांनी गट स्थापनेसाठी सह्या केल्याचं दिसून आलं आहे. तशा सह्या करत असतानाचा व्हिडीओ एबीपी माझाच्या हाती लागला आहे. शिंदेंना गट स्थापन करण्यासाठी 37 आमदारांची गरज होती आणि त्या सर्व आमदारांच्या सह्या घेण्याचं काम पूर्ण झाल्याची माहिती एबीपी माझाला सूत्रांनी दिली आहे.
आम्ही बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व आणि त्यांची भूमिका पुढे घेऊन जाणार : एकनाथ शिंदे
गुवाहाटी विमानतळावर दाखल होताच एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार पुढे नेणार असल्याचा पुनरुच्चार केला. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे बोलताना म्हणाले की, "शिवसेनेचे 40 आमदार माझ्यासोबत आहेत. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व आणि त्यांची भूमिका पुढे घेऊन जाणार आहोत." पुढे बोलताना ते म्हणाले की, मला कोणावरच टीका टिप्पणी करायची नाही. शिवसेनेचे आमदार माझ्यासोबत इथे उपस्थित आहेत. बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व आम्ही सर्वजण पुढे घेऊन जाणार आहोत." तसेच, सध्या 40 आमदार माझ्यासोबत आहेत आणखी 10 आमदार इथे येणार असल्याचंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.
एकनाथ शिंदेंसोबतच्या आमदारांचा फोटो व्हायरल
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे आता स्वतंत्र गट स्थापन करण्याची आता दाट शक्यता निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांचा फोटो व्हायरल झाला आहे. शिंदे यांनी स्वतंत्र गटासाठी आवश्यक असलेली 37 ही संख्या पूर्ण केली असल्याचे सध्या चित्र आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मुंबईत दाखल झाले आहेत. आज भाजप आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्यात मोठ्या घडामोडी घडणार आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :