OPS: हिमाचलचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या देव्हाऱ्यात! जुनी पेन्शन योजना राज्यात कधी? कर्मचाऱ्याचा फोटो व्हायरल
हिमाचल प्रदेश सरकारनं काल जुनी पेन्शन योजना मंजूर केल्यानंतर महाराष्ट्रातील एका कर्मचाऱ्याचा फोटो व्हायरल झाला आहे. यात मुख्यमंत्री सुखू यांचा फोटो चक्क देव्हाऱ्यात ठेवून पूजला जात असल्याचं दिसत आहे.
![OPS: हिमाचलचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या देव्हाऱ्यात! जुनी पेन्शन योजना राज्यात कधी? कर्मचाऱ्याचा फोटो व्हायरल Maharashtra Old Pension Scheme himachal pradesh cm photo in temple viral ahmednagar latest marathi news OPS: हिमाचलचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या देव्हाऱ्यात! जुनी पेन्शन योजना राज्यात कधी? कर्मचाऱ्याचा फोटो व्हायरल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/14/655c13a67f564b5328bee917430e5a1a167371607478284_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maharashtra Old Pension Scheme: हिमाचल प्रदेश सरकारनं (Himachal Pradesh Sarkar On OPS) काल कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. हिमाचलमध्ये जुनी पेन्शन योजना मंजूर केली आहे. मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू यांच्या मंत्रिमंडळाने शुक्रवारी पहिल्याच बैठकीत निवडणुकीदरम्यान दिलेले आश्वासन पूर्ण करत जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. हा निर्णय आल्यानंतर महाराष्ट्रात जुन्या पेन्शन योजनेसाठी लढणारे कर्मचारी पुन्हा सरकार दरबारी याचना करताना दिसत आहेत.
मुख्यमंत्री सुखविंदर सिह सुखू यांचा फोटो चक्क देव्हाऱ्यात
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करणं शक्य नसल्याचं स्पष्ट सांगितल्यानंतरही कर्मचारी मात्र मागे हटायला तयार नाहीत. कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं ते सतत आपल्या मागणीवर ठाम असल्याचं दिसतंय.हिमाचल प्रदेश सरकारनं काल जुनी पेन्शन योजना मंजूर केल्यानंतर महाराष्ट्रातील एका कर्मचाऱ्याचा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत पेन्शन देवता म्हणत हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू यांचा फोटो चक्क देव्हाऱ्यात ठेवून पूजला जात असल्याचं दिसत आहे.
हा फोटो अहमदनगरमधील असल्याचं समोर आलं आहे. हे संजय सोनार नावाचे आरोग्य सेवक आहेत. सोनार यांनी हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सिह सुखू यांचा फोटो देव्हाऱ्यात ठेवला आहे. शिवाय ते या फोटोला हात जोडताना दिसून येत आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत स्पष्ट सांगितलं होत की, राज्यात जुनी पेन्शन योजना लागू होणार नाही. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं होतं की, 2005 मध्ये पेन्शन योजना (Maharashtra Old Pension Scheme) बंद झाली आहे. राज्याचे हित लक्षात घेऊन जुनी पेन्शन योजना रद्द करण्यात आली. या पेन्शन योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर एक लाख 10 हजार कोटींचा बोझा पडेल. यातून राज्य दिवाळखोरीत निघेल, असं ते म्हणाले होते. असं असलं तरी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे प्रयत्न अद्यापही सुरु आहेत.
काँग्रेसशासित राज्यांपैकी राजस्थान, छत्तीसगड आणि आता हिमाचल प्रदेश या राज्यांनी आधीच जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने डिसेंबर 2003 मध्ये जुनी पेन्शन योजना बंद करण्याचा निर्णय घेतला होता. 1 एप्रिल 2004 पासून ही योजना बंद करण्यात आली. मात्र आता अनेक संघटना आणि विरोधी पक्ष जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा आग्रह धरत आहेत.
ही बातमी देखील वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)