Sanjay Rathod | संजय राठोड यांच्या समर्थकांच्या गर्दीमुळे कोरोना वाढल्यास जबाबदार कोण?
संजय राठोड यांच्या स्वागतासाठी पोहरोदेवी येथे जमलेल्या गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्जही करावा लागला. या गर्दीमुळे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वाशिम : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणानंतर अडचणीत सापडलेले वनमंत्री संजय राठोड आज पोहरादेवी येथे दाखल झाले. यावेळी संजय राठोड यांच्या स्वागतासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी याठिकाणी मोठी गर्दी केली होती. राज्यात कोरोनाचं संकट वाढत असताना गर्दी टाळावी, कोरोना संसर्ग वाढणार नाही याची योग्य खबरदारी घ्यावी, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. मात्र त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्र्याने मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला केराची टोपली दाखवली आहे. पोहरादेवी येथे झालेल्या गर्दीत कोरोनाच्या नियमांचं पालन करण्यात आलं नाही.
संजय राठोड यांच्या स्वागतासाठी पोहरोदेवी येथे जमलेल्या गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्जही करावा लागला. या गर्दीमुळे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वाशिम आणि यवतमाळमध्येही कोरोनाची रुग्ण झपाट्याने वाढताना दिसत आहेत. संजय राठोड यांच्या समर्थकांनी केलेल्या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढल्यास त्याला जबाबदार कोण? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सर्वांवर कारवाई करणार का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.
पोहरादेवी गर्दी प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करा- प्रवीण दरेकर
एकीकडे मुख्यमंत्री मास्क घाला, असं अवाहन करतात तर दुसरीकडे शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत संजय राठोड गर्दी करत आहेत हे गंभीर आहे. उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि ठाकरी बाणा दाखवावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
Sanjay Rathod | संजय राठोड का आवडे सर्वांना?
वाशिम कोरोना अपडेट (22 फेब्रुवारी)
वाशिम जिल्ह्यात काल (22 फेब्रुवारी) आणखी 62 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 27 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
वाशिम कोरोना बाधितांची सद्यस्थिती
- एकूण कोरोनाबाधित रुग्ण – 7835
- अॅक्टिव्ह – 537
- डिस्चार्ज – 7141
- मृत्यू – 156
यवतमाळ कोरोना अपडेट
यवतमाळ जिल्ह्यात 21 फेब्रुवारी रोजी एका मृत्युसह 75 जण पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. तर 53 रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर 22 फेब्रुवारी रोजी 210 जणांनी कोरोनाची लागण झाली, तर 107 जण कोरोनामुक्त झाले. एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
कोरोना बाधितांची सद्यस्थिती
- एकूण कोरोनाबाधित रुग्ण :16255
- एकूण अॅक्टिव्ह रुग्ण :1052
- एकूण कोरोनामुक्त रुग्ण :14755
- मृत्यू- 448