Sanjay Rathod | संजय राठोड का आवडे सर्वांना?
संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यामागे बंजारा समाज उभा असल्याचं दिसून येतंय. त्यामुळेच महाविकास आघाडीतील (Mahavikas Aaghadi) मोठे नेते, खासकरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते त्यांच्या मागे असल्याचं दिसून येतंय. संजय राठोड यांच्या राजकीय कारकिर्दीचा घेतलेला आढावा...
मुंबई: पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्या प्रकरणामुळे चर्चत आलेले महाविकास आघाडीचे मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) बंजारा समाजाचे मोठे नेते आहेत. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात बंजारा समाजातील नेते, महंत आणि अनेक लोक संजय राठोड यांच्या मागे भक्कमपणे उभे असल्याचं चित्र आहे. तसेच संजय राठोड यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल झाला नाही. शिवसेनेसह महाविकास आघाडीतील कोणत्याही नेत्याने अद्याप या प्रकरणी संजय राठोड यांच्यावर कारवाईचे समर्थन केलं नाही.
मग प्रश्न असा पडतो की संजय राठोड यांच्यावर कोणतीही कारवाई का केली जात नाही? पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण इतकं गंभीर असूनही संजय राठोड यांच्यामागे बंजारा समाज आणि महाविकास आघाडीचे नेते का उभे आहेत? या प्रश्नाचं उत्तर संजय राठोड यांच्या नेतृत्वात दडलं आहे.
संजय राठोड हे विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस विधानसभा मतदारसंघात गेली तीन टर्म सतत निवडून येत आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वाधिक मताधिक्य मिळवणाऱ्या आमदारांपैकी एक आमदार म्हणजे संजय राठोड होय. ते बंजारा समाजाचे मोठे नेते असून वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांच्यानंतर जे काही नेते बंजारा समाजाला आपले वाटतात त्यापैकी संजय राठोड यांचं स्थान अगदी वरचं आहे.
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात बंजारा समाजाचं मोठं निर्णायक मतदान आहे. या लोकसभा मतदारसंघात जवळपास पाच लाख इतकं मतदान हे बंजारा समाजाचं आहे. त्यामुळे संजय राठोड यांच्या विरोधात कारवाई करण्याचं समर्थन करण्याचं धाडस कोणताही नेता उघडपणे करताना दिसत नाही.
संजय राठोड हे पहिल्यांदा 2004 साली दारव्हा मतदारसंघातून विधानसभेत पोहोचले. त्यांनी काँग्रेसच्या माणिकराव ठाकरे यांचा 21 हजार 542 मतांनी पराभव केला. त्यावेळी संजय राठोड यांना 68 हजार 586 मतं पडली तर तर माणिकराव ठाकरेंना 47 हजार 44 मतं पडली होती. संजय राठोड यांनी 2009 साली दिग्रस विधानसभा मतदारसंघातून एकूण एक लाख 92 हजार मतांपैकी 54.13 टक्के म्हणजे एक लाख चार हजार मतदान घेतलं होतं. त्यावेळी 54 हजार 145 इतक्या प्रचंड मताधिक्याने संजय राठोड विजयी झाले होते. 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती तुटली, हे दोन्ही पक्ष वेगवेगळे निवडणूक लढले.
त्यावेळी एकूण 2 लाख 846 मतदानापैकी संजय राठोड यांना तब्बल 60.10 टक्के म्हणजे एक लाख 21 हजार मतं घेतली. त्यावेळी राठोड हे जवळपास 80 हजार मतांनी विजयी झाले होते. त्यावेळी भाजप उमेदवाराला केवळ साडेपाच टक्के म्हणजे 1 हजार 902 मतं पडली होती.
गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी संजय राठोड यांनी एकूण मतांच्या 60 टक्के मते घेतली होती आणि तब्बल 63 हजार 606 मतांनी विजय मिळवला होता. सातत्याने तीन निवडणूका आणि सातत्याने मिळणारं मोठं मताधिक्य यामुळे संजय राठोड यांना या वेळच्या मंत्रिमंडळात वनमंत्री होण्याची संधी मिळाली.
पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केल्यानंतर तिच्या संबंधी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राठोड यांच्या आवाज असल्याचं सांगण्यात येतंय. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नाही. बंजारा समाजासोबतच शिवसेना आणि राष्ट्रवादीचे बडे नेते संजय राठोड यांच्या पाठीशी असल्याचं दिसून आलंय.
काय आहे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण? मूळची बीडमधल्या परळीची असलेल्या पूजा चव्हाण या 22 वर्षाच्या मुलीचा पुण्यातील राहत्या घरातून पडून 7 फेब्रुवारीला मृत्यू झाला. पूजाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. इंग्लिश स्पीकिंगच्या क्लाससाठी ती पुण्यात राहात होती. तिने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचा संशय आहे. तिच्या आत्महत्येनंतर आत्महत्येशी विदर्भातील एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सुरु झाली होती. भाजपने तक्रार दाखल केली. शिवाय विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट पोलीस आयुक्तांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली. त्यातच पूजा चव्हाण आणि कथित मंत्र्यांच्या एक-दोन नव्हे तर तब्बल 12 ऑडिओ क्लिप समोर आल्या. त्यानंतर या ऑडिओ क्लिपमधील आवाज वनमंत्री संजय राठोड यांचाच असल्याचा दावा करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राठोड यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.