Pooja Chavan Death Case | मंत्री शिवसेनेचा, पाठीशी राष्ट्रवादी; अजित पवार आणि नवाब मलिकांकडून संजय राठोड यांची पाठराखण
Pooja Chavan Death Case : पूजा चव्हाण प्रकरणात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी केलेल्या पाठराखणीने शिवसेना मंत्र्यांची अडचण झाली आहे, कारण एकीकडे राठोड प्रकरणात शिवसेना मंत्री चिडीचूप असताना राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी राठोड यांची पाठराखण केली.
मुंबई : पूजा चव्हाण प्रकरणात शिवसेना मंत्री संजय राठोड यांचे नाव चांगलंच चर्चेत आलं आहे. संजय राठोड यांच्या ओडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. त्यामुळे गेल्या 10 दिवसांपासून संजय राठोड नॉट रिचेबल झाले आहेत. पण राठोड आमच्या संपर्कात असल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे. तर दुसरीकडे नवाब मलिक यांनी मीडियावर खापर फोडत राठोड यांचा बचाव केला. पूजा चव्हाण प्रकरणात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी केलेल्या पाठराखणीने शिवसेना मंत्र्यांची अडचण झालीय कारण एकीकडे राठोड प्रकरणात शिवसेना मंत्री चिडीचूप असताना राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी राठोड यांची पाठराखण केली.
अजित पवार काय म्हणाले? पूजा चव्हाण प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत राजीनामा घेणं योग्य होणार नाही धनंजय मुंडे प्रकरणात असंच झालं विरोधक टीका करत गेले पण नंतर चित्र वेगळेच दिसलं. धनंजय मुंडेबाबत माहिती न घेता राजीनामा घेतला असता तर त्यांची बदनामी झाली असती. त्यामुळे चौकशी पूर्ण होऊ द्या मग काय तो निर्णय घेता येईल सर्वांनी संयम बाळगण्याची गरज आहे, असं अजित पवार म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "पूजा चव्हाणच्या वडिलांची बाजूही ऐकायला हवी पोलीस आपलं काम करत आहेत त्याचा अहवाल येईपर्यत काही बोलणं उचित ठरणार नाही राजकीय क्षेत्रात काम करत असताना असे आरोप होतात."
Pooja Chavan Death Case | संजय राठोड गायब नाहीत, ते संपर्कात आहेत : अजित पवार
नवाब मलिक काय म्हणाले? शिवसेना मंत्री संजय राठोड यांची पाठराखण करताना राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक थेट मीडियावर घसरले. सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे, TRP साठी लोकांची बदनामी करण्याचा धंदा मीडियाकडून सुरु आहे. राठोड यांना माझा सल्ला आहे, त्यांनी खुलासा करु नये. खुलासा करण्यात नवीन प्रश्न निर्माण होतील. चौकशीतून सत्य बाहेर येईल. मी पूजाचा स्टेटस पाहिला वडील, आई, राठोड यांचा फोटो आहे. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने अर्थ लावू नये, असं बोलत मलिक यांनी थेट राठोड यांना भक्कम पाठिंबा दिला.
"राजकारणात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. प्रशासन योग्य रितिनं काम करत आहेत. चौकशी अहवाल आल्यावर कारवाई अपेक्षित जोपर्यंत अहवाल येत नाही तोपर्यंत आरोप करणे योग्य नाही," असंही ते म्हणाले.
संजय राठोड कॅबिनेटला गैरहजर मंत्रिमंडळाची आज (17 फेब्रुवारी) बैठक झाली या बैठकीला राठोड यांनी दांडी मारली. गेल्या दहा दिवसांपासून राठोड हे नॉट रिचेबल आहेत पण मंत्र्यांच्या संपर्कात असल्याचं बोललं जातं आहे.
पूजा चव्हाण प्रकरणानंतर राठोड यांच्यावर दबाव वाढत चालला आहे. राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी गेली जाते. पोलीस अहवाल जोपर्यंत सादर केला जात नाही तोपर्यंत राठोड यांच्यावर कुठलीही कारवाई केली जाणार नसल्याचं कळतं आहे.