(Source: ECI/ABP News/ABP Majha)
यवतमाळ मुलांना पोलिओ लसऐवजी सॅनिटायझर पाजल्याप्रकरणी चौघांवर कारवाई
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कंलिदा पवार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आज वैद्यकीय महाविद्यालयमध्ये जाऊन बालकांच्या आरोग्याची पालकांना भेटून चौकशी केली.
यवतमाळ : यवतमाळमध्ये 12 बालकांना पोलिओ लस ऐवजी सॅनिटायझर पाजल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणी आता चौघांवर कारवाई करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी भूषण मसराम, वैद्यकीय अधिकारी महेश मनवर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तर समुदाय आरोग्य अधिकारी अमोल गावंडे आणि आशा वर्कर संगीता मसराम यांच्यावर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कंलिदा पवार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आज वैद्यकीय महाविद्यालयमध्ये जाऊन बालकांच्या आरोग्याची पालकांना भेटून चौकशी केली.
यवतमाळमधील घाटंजी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या कापसी कोपरी येथे पोलिओ लसीकरणादरम्यान लहान मुलांना सॅनिटीझर पाजण्यात आलं होतं. 1 ते 5 वयोगटातील ही मुले आहेत. सध्या सर्व मुलांची तब्येची ठिक असून काळजी करण्याचं कारण नाही.
पोलिओ लसीकरणादरम्यान 12 बालकांना सॅनिटायझर पाजलं, यवतमाळमधील घटना
सॅनिटायझर पाजलेल्या 12 लहान बालकांना यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. सुरुवातीला मुलांना उलट्याचा त्रास सुरू झाला होता. त्यांनंतर त्यांना परवा रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यवतमाळचे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनीही रात्री रुग्णालयात भेट देऊन मुलांच्या प्रकृतीची चौकशी केली. या संपूर्ण घटनेची चौकशी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ करत आहेत.
मुलांना लस म्हणून सॅनिटीझर पाजण्यात आले हे लक्षात आल्यानंतरही कर्मचाऱ्यांनी उशिरापर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत काही सांगितले नाही. संपूर्ण प्रकार गंभीर असून यात कोणाकडून ही चूक झाली याची चौकशी करुन कारवाईचा इशारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिला होता.