Pankaja Munde : मी भाजपची आहे, पण भाजप माझा एकट्याचा पक्ष नाही; पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
Pankaja Munde : भीती न वाटणं हे आमच्या रक्तातच असल्याचं देखील पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
![Pankaja Munde : मी भाजपची आहे, पण भाजप माझा एकट्याचा पक्ष नाही; पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण Maharashtra News Pankaja Munde statement On BJP party Political statement Maharashtra politics Pankaja Munde : मी भाजपची आहे, पण भाजप माझा एकट्याचा पक्ष नाही; पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/28/e73131d410410b5f7d040d78bb17fea21664343076204503_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pankaja Munde On BJP : राष्ट्रीय समाज पक्षाने बुधवारी (31 मे) दिल्लीत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी केली. दरम्यान याच कार्यक्रमाच्या भाषणामध्ये भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. त्या म्हणाल्या, मी भाजपची आहे, पण भाजप थोडाच माझा एकट्याच पक्ष आहे. महादेव जानकरांचा स्वतःचा पक्ष आहे तसा भाजप कुणी एकट्याचा नाही, ही पक्ष खूप मोठा आहे, मी त्याची एक कार्यकर्ती आहे, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले आहे. त्यामुळे त्यांच्या याच वक्तव्याचे आता वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ काढले जात असून, यावर राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहे. पंकजा मुंडेंच्या अगोदर महादेव जानकरांचे भाषण झाले. त्यावेळी जानकर पंकजा मुंडेना भाजप हा वारंवार तुमचा पक्ष असे म्हणत होते त्यावर भाष्य करताना पंकजा मुंडेंनी वक्तव्य केले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं म्हटलं आहे. पंकजाताई भाजप माझ्या पाठिशी आहे, असंच म्हणाल्या, असं बावनकुळे म्हणाले
कुस्तीपटूंचं दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनावरून भाजप खासदार डॉ. प्रीतम मुंडे (BJP MP Pritam Munde) यांनी स्वतःच्याच पक्षाला घरचा आहेर दिला असतानाच, आता पंकजा मुंडेंच्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दिल्लीत आयोजित पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे की, "मी भाजपची आहे, पण भाजप ही पार्टी माझी थोडीच आहे. मला भीती वाटत नाही. कशाचीच भीती वाटत नाही. भीती न वाटणं हे आमच्या रक्तातच आहे. कशाची चिंता नाही. काही नाही मिळालं तर मी ऊस तोडायला जाईल. आम्हाला काही गमवायचंच नाही. आम्हाला आयुष्यात कोणत्याही गोष्टीची आस्था, अपेक्षा आणि लालसा नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. तर त्यांच्या याच वक्तव्यावरून आता चर्चांना उधाण आले आहे.
राजकीय प्रतिकिया
दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्यानंतर एकदा अनेक राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहे. ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांची देखील पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावर प्रतिकिया आली आहे. "पंकजा मुंडे यांनी त्यांची व्यथा बोलून दाखवली. ज्यांनी भाजप शून्यातून निर्माण केला, त्याचं आज अस्तित्त्व काय उरलंय? राजकीय कुटुंबातील व्यक्तींनी परिणामांचा विचार न करता निर्णय घेतला तरच त्यांचं अस्तित्त्व टिकून राहील, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
अनिल देशमुख यांची प्रतिकिया
दरम्यान राष्ट्रवादीचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावर प्रतिकिया दिली असून, पंकजा मुंडेना राष्ट्रवादीत यायचं असेल तर बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि इतर स्थानिक नेत्यांसोबत चर्चा करून त्यावर निर्णय घेतला जाईल. असं राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख म्हणालेत.
इतर महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)