Nashik Trimbakeshwer Yatra : ऑनलाईन दर्शन, निर्मल वारीसह निर्मल दिंडी पुरस्कार, संत निवृत्तीनाथ यात्रा त्र्यंबकेश्वर
Nashik Trimbakeshwer Yatra : त्र्यंबकेश्वर संत निवृत्तीनाथ यात्रा निमित्ताने त्र्यंबक प्रशासन आणि मंदिर प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.
Nashik Trimbakeshwer Yatra : अवघ्या दोन दिवसांवर त्र्यंबकेश्वर संत निवृत्तीनाथ यात्रा येऊन ठेपली असून त्र्यंबक प्रशासन आणि मंदिर प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. मंदिर संस्थानकडून कृत्रिम सभामंडप, कृत्रिम दर्शन बारी, आरोग्य व्यवस्था, सीसीटीव्हीची उभारणी, निर्मल वारी आदींवर भर देण्यात आला आहे.
त्र्यंबकेश्वर यात्रा नियोजनाची जय्यत तयारी झाली असून यंदा संत निवृत्तीनाथ मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम सुरु आहे. त्यामुळे यंदाच्या यात्रेच्या निमित्ताने जवळपास 500 दिंड्या येणार असून 3 लाख ते 4 लाख वारकरी येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने त्र्यंबकेश्वर देवस्थान संस्थांनकडून भाविकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये टँकरद्वारे अधिकचा पाणी पुरवठा होणार असून निर्मल वारीच्या निमित्ताने यंदाच्या यात्रेच्या निमित्ताने शहरात जवळपास 1500 टॉयलेट्स उभारण्यात येणार असून यासाठी 27 ठिकाण निश्चित करण्यात आली आहेत. तसेच लाखो भाविकांची उपस्थिती असल्याने सर्व ठिकाणी टँकर द्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर त्र्यंबक प्रशासनाकडून ठिकठिकाणी कचरा कुंड्या ठेवण्यात येणार आहेत. जेणेकरून येणाऱ्या दिंडयांना दिंड्यातील निघालेला कचरा हा कचरा कुंडीत टाकण्याची सोया होईल. तसेच त्या त्या दिंड्याच्या ठिकाणी कचरा बिन बॅग देण्यात येणार असून याद्वारे दिंड्याना कचरा साठवण्यासाठी मदत होणार आहे. तसेच लाखो भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शहरात मेडिकल सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालय सज्ज झाले आहे. शहरात वारकऱ्यांसाठी दोन मेडिकल वाहने, तालुका वैद्यकीय अधिकारी उपलब्ध असणार आहेत. यंदाच्या त्र्यंबकेश्वर यात्रेसाठी नगरपरिषदेचे 80 कर्मचारी तैनात असणार आहेत. तसेच त्र्यंबकेश्वर मंदिर संस्थानकडून 25 हुन अधिक कर्मचारी, स्वयंसेवक, एनसीसीचे विद्यार्थ्यांना देखील सहभागी होणार आहेत.
निर्मल दिंडी पुरस्कार
यंदा निर्मल दिंडी पुरस्कार देण्यात येणार आहे. जवळपास पाचशेहून अधिक दिंडया त्र्यंबकेश्वर शहरात दाखल होत असून या पार्श्वभूमीवर निर्मलवारी करण्याचा निश्चय आहे. या पार्श्वभूमीवर येणाऱ्या दिंड्यासाठी महत्वाचे आवाहन करण्यात आले आहे. आपण थांबत असलेल्या ठिकाणी योग्य स्वच्छतेचे नियोजन केल्यास निर्मल दिंडी पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्काराचे दिंडी उपयोगी साहित्य देण्यात येणार असून स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे.
ऑनलाईन दर्शन सुविधा ...
दरम्यान ज्या वारकऱ्यांना दिंडीत येणं शक्य होणार नाही त्या भाविकांसह इतर राज्यातील भाविक भक्तांसाठी ऑनलाईन दर्शन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जवळपास त्र्यंबक प्रशासनाकडून 32 सिसिटीव्ही कॅमेरे आणि देवस्थान कडून दहा ते पंधरा सीसीटीव्ही कॅमेरे तैनात ठेवण्यात येणार आहेत. याचबरोबर मंदिर परिसरात, मंदिराच्या आतील बाजूस मंदिर प्रशासन, बाहेरील बाजूस स्थानिक प्रशासनाकडून सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर अनाऊसिंग व्यवस्था उपलब्ध करून दिला जाणार आहे. याबाबतची माहिती त्र्यंबक पोलिसांकडून वेळोवेळी देण्यात येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
बसेसने वेगमर्यादा पाळावी...
दरम्यान पायी येणारे वारकरी दिंड्या यांना वाहनाची धडक बसून अपघात होत असतात. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाने त्र्यंबकेश्वर कडे येणाऱ्या बससाठी वेग मर्यादा ठरवून द्या अशी मागणी करण्यात आली आहे याशिवाय निर्मल वारीसाठी फिरते शौचालय शुद्ध पाणी कुशावर्त कुंडाची स्वच्छता आदींची मागणी करण्यात आली आहे. संत निवृत्तीनाथ यात्रा निर्मल वारीसारखी व्हावी यासाठी देवस्थानच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहे. पोलीस प्रशासनाकडून उत्सव काळात गर्दी होऊ नये यासाठी दुभाजक मागून मंदिर परिसर बंदिस्त करण्यात आला आहे. मानाच्या दिंड्यांसाठी राहुट्यांची व्यवस्था करण्यात येणार असून श्रीफळ प्रसाद देऊन त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे.
यात्रेदरम्यान पार्किंग व्यवस्था
संत निवृत्तीनाथ यात्रेसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून ठीकंठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. तर यात्रेच्या दोन ते तीन दिवस वाहतूक व्यवस्थेतही बदल करण्यात आले आहेत. तसेच खासगी वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था देखील करण्याचे नियोजन आहे. नाशिकहून त्र्यंबकेश्वर येण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसेसचे व्यवस्था करण्यात आला आहे. तळेगाव फाट्यानजीक खंबाळे पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. येथून बसने त्र्यंबकला येता येणार आहे.