(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Leopard : नाशिकच्या वडाळागावात दोन तासांच्या रेस्क्यूनंतर बिबट्या जेरबंद, नेहमीच्या गर्दीच करायचं काय?
Nashik Leopard : नाशिक (Nashik) वनविभागाने वडाळागावात दोन तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर बिबट्याला जेरबंद केले.
Nashik Leopard : नाशिकचा (Nashik) वडाळा गाव परिसर, रात्री दहा वाजेची वेळ, परिसरातील नागरिक झोपण्याच्या तयारीत, अशातच बिबट्या (Leopard) अवतरला. आणि परिसरातील नागरिकांना पळता भुई थोडी झाली. मात्र नेहमीप्रमाणे बघ्यांची गर्दी, अन् या गर्दीला तोंड देऊन नाशिक वनविभागाने पुन्हा एकदा दोन तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर बिबट्याला जेरबंद केले.
बिबट्याचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या नाशिक शहराला बिबट्याचे दर्शन काही नवीन नाही. मात्र काही दिवसांत बिबट्याचे दर्शन कमी झाल्याचे पाहायला मिळत होते. अशातच पुन्हा एकदा बिबट्या शहर वासियांना दिसू लागला आहे. नाशिक शहरातील वर्दळीचा भाग असलेल्या वडाळा गावातील आयेशानगर भागात रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास परिसरात एका बंगल्यात शिरत बस्तान मांडले. मात्र ज्यावेळी बंगला मालकाला ही गोष्ट निदर्शनास आल्यानंतर त्याची पाचावर धारण बसली. ही परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने नेहमीप्रमाणे काही क्षणांत अख्ख गाव बिबट्याला बघण्यासाठी उपस्थित झाले. काही वेळानंतर नाशिक वनविभागाने (Nashik Forest) तातडीने घटनास्थळी धाव घेत रेस्क्यू ऑपरेशनला सुरवात केली.
आयेशानगर येथील एजाज काझी यांच्या बंगल्यात बिबट्या शिरला. बंगला मालकाला याबाबत कुणकुण लागल्यांनंतर त्यांनी लागलीच वनविभागाला माहिती दिली. नाशिक वनविभागासह मुंबई नाका पोलीस (Mumbai Naka Police) देखील घटनास्थळी दाखल झाले. दरम्यानच्या काळात बिबट्याने बंगल्यातील कारखाली बस्तान मांडून दोन तास वनविभागाला हैराण केले. वनविभागाचे वनक्षेत्रपाल विवेक भदाणे, वनपरिमंडल अधिकारी अनिल अहिरराव यांनी वाहनाखाली दबा धरून बसलेल्या बिबट्याला मोठ्या शर्थीने भुलीचे इंजेक्शन देत बिबट्याला बेशुद्ध केले. मात्र स्थानिक नागरिकांनी गर्दीमुळे बिबट्याला रेस्क्यू करतांना नेहमीप्रमाणे अडचणी आल्याचे वनविभागाने सांगितले. रात्री दहा वाजेपासून ते बारा वाजेपर्यंत रेस्क्यू ऑपरेशन सुरु होते. दरम्यान मोठ्या अथक प्रयत्नानंतर वनविभागाने बिबट्याला रेस्क्यू करत कार्यालयात रवानगी करण्यात आली.
गर्दीच करायचं काय?
एकीकडे शहर परिसरात बिबट्याचे दर्शन नित्याचे झाले आहे. याचबरोबर शहरातील कुठल्याही भागात बिबट्या दिसून आला कि, वनविभागाच्या आधी स्थानिक नागरिकांची भली मोठी फौंज बिबट्या असलेल्या घटनास्थळी दिसून येते. त्यामुळे प्रत्येकवेळी बिबट्या रेस्क्यू करताना स्थानिक नागरिक मोठया प्रमाणावर अडचणी निर्माण करतात. शिवाय वनविभागाला देखील अशावेळी सतर्क राहून काम करणे गरजचे असताना गर्दीमुळे अनेकदा बिबट्या हाताबाहेर जातो. अनेकदा रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना काही नवीन नाहीत. आयेशानगर भागात बिबट्याचे आगमन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर बघ्यांची गर्दी होती. या संदर्भातील व्हिडीओत पाहायला मिळते. प्रचंड गर्दी झाल्याने पोलिसांना आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना गर्दीला दूर करणे कठीण होते. लोकांच्या गोंधळामुळे बिबट्या घाबरून दुसरीकडे पसार होतो. त्यामुळे आगामी काळात नाशिक पोलीस आणि वनविभागाने यावर ठोस पाऊल उचलणे आवश्यक आहे.