(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik News : तस्करीच्या केवळ अफवाच, उंटांचा तांडा हा नाशिकचाच, पोलिसांच्या अहवालातून उघड
Nashik News : काही दिवसांपूर्वी नाशिक (Nashik) शहरात शंभरहून अधिक उंट दाखल झाल्याने शहरात चर्चाना उधाण आले होते.
Nashik News : काही दिवसांपूर्वी नाशिक (Nashik) शहरात शंभरहून अधिक उंट दाखल झाल्याने शहरात चर्चाना उधाण आले होते. कुणी तस्करीसाठी तर कुणी म्हणे हैदराबादला कत्तलीसाठी पाठविण्यात येत असल्याचे तर्क लढविले गेले. मात्र या सगळ्या अफवा असून उंटाचे मालकही त्यांच्या सोबत असून ही सर्व मंडळी नाशिकमध्येच (Nashik) वास्तव्यास असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
नाशिक शहरात (Nashik) दोन दिवसांपूर्वी उंटांची (Camel) रांगाच्या रांगा पाहायला मिळाल्या. यामुळे यंत्रणा देखील सैरभैर झाली. हे उंट शंभरहून अधिक असल्याने साधक बाधक चर्चाना उधाण आले. यातील काही उंट त्राण गळालेल्या अवस्थेत होते, तर काही जखमी अवस्थेत होते. त्यामुळे अचानक दाखल झालेल्या उंटाचे गूढ वाढत गेले. यानंतर स्थानिक प्राणिमित्रांनी हे उंट तस्करीसाठी हैदराबादला नेले जात असल्याचा दावा केला. मात्र पोलीस तपासात वेगळी माहिती समोर आली आहे. हे सर्व उंट व त्यांचे मालक नाशिकमधील असून गेल्या काही दिवसांपासून ते गुजरातला वास्तव्यास होते, त्यानंतर ते पुन्हा नाशिकला मार्गस्थ झाले होते. असा प्रवास करत असताना उंटाची अवस्था खराब होत गेली.
गेल्या चार पाच दिवसात नाशिक शहरात शेकडोंच्या संख्येने उंट दाखल होत आहेत. गुजरात, राजस्थान सीमा भागातून शेकडो किलोमीटर पायपीट करून येणाऱ्या उंटाची प्रकृती बिघडत आहेत. सद्यस्थितीत या उंटाना नाशिकच्या पांजरापोळमध्ये ठेवण्यात आले असून तिथे त्यांच्यावर उपचार आणि संगोपन ही केले जात आहे. दरम्यान या उंटांसोबत असलेले मदारी 'आम्ही नाशिकचे असून उदरनिर्वाहासाठी उंटाचे पालनपोषण करत असल्याचा दावा केला आहे. मात्र आता प्रशासन काय पावले उचलते, याकडे लक्ष लागून आहे. नाशिकमध्ये दाखल झालेल्या उंटाना माघारी राजस्थानमध्ये पाठविले जाणार की नाशिकच्या पांजरापोळमध्ये त्याचे शासनाच्या माध्यमातून संगोपन केले जाणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
काय नेमकं प्रकरण?
दरम्यान सुरवातीला जेव्हा नाशिक शहरात उंट दाखल होण्यास सुरवात झाली. तेव्हा सर्वाना आश्चर्य वाटले. त्यातच अनेक उंटांची तब्येत खालावल्याने हे उंट कत्तलीसाठी जात असल्याचा दाट संशय नागरिकांना आला. मात्र नाशिक शहरात दाखल होण्यापूर्वी ही लोक, धुळे, सटाणा, दिंडोरी, मालेगाव आदी भागातून नाशिक शहरात दाखल होत होते. त्यामुळे संबंधित पोलीस स्टेशनला या सर्वांची नोंद होत असल्याचे पोलिसांची म्हणणे आहे. त्यानुसार सटाणा पोलिसांनी नाशिककडे सोडताना सर्वांचे आधारकार्ड तपासून नाशिकच्या दिशेने सोडले. त्याचबरोबर गेल्या तीस वर्षांपासून ते नाशिकमधेय राहून उदरनिर्वाह करत असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र काम नसल्यावर त्यांनी गुजरात गाठले आणि आता पावसाळ्यापूर्वी पुन्हा नाशिकला प्रस्थान केल्याचे पोलिसांनी सांगितले.