Nashik News : नाशिकमध्ये उंटांचा निदर्यपणे छळ, सतत चालून पायांना जखमा, मालकांविरुद्ध गुन्हा
Nashik News : नाशिकमध्ये दाखल झालेल्या उंटांना अन्नपाण्याविना ठेवत शेकडो किलोमीटर चालविल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
Nashik News : राजस्थान (Rajsthan) आणि अन्य राज्यातून नाशिकमध्ये अचानक उंटांचा कळपच दाखल झाला. मात्र पोट खपाटीला गेलेले, पाय रक्ताळलेले अशा अवस्थेत 'हे उंट चालत असल्याचे दिसून आले. त्यानुसार सदर उंटांना अन्नपाण्याविना ठेवत शेकडो किलोमीटर चालवल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले आहे. उंटांना क्रूर वागणूक देणाऱ्या सात जणांवर दिंडोरी पोलीस ठाण्यात (Dindori Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात तीन मालक नाशिक शहरातील असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
गेल्या पाच ते सात दिवसांपासून नाशिक (Nashik) शहर आणि जिल्ह्यात सूरत आणि राजस्थान येथून शेकडो उंटांना (Camels) आणले जात असल्याचे समोर आले. या पार्श्वभूमीवर जवळपास शंभरहून उंटांना जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेत त्यांना पांजरापोळ जंगलात सोडण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील सटाणा, कळवण, दिंडोरी, वाणी परिसरातून हे उंट नाशिक शहरात दाखल होत होते. उंट थकलेले, त्राण गळालेले, पायांवर जखमा असलेल्या अवस्थेत दिसून आले. संबंधित पोलीस स्टेशनने उंटांच्या या अवस्थेबाबत पाहणी केली. तातडीने संबंधित उंटांना ताब्यात पशुधन विकास अधिकाऱ्यामार्फत उंटांची तपासणी करण्यात आली. यात 29 उंट अन्नपाण्याविना शेकडो किलोमीटर अंतरावरून पायी चालवून आणल्याने त्यांना अशक्तपणा आल्याचे समोर आले. त्यानंतर अशा पद्धतीने उंटांना सतत चालवून छळ केल्याचा प्राणिमित्रांनी आरोप केला आहे.
दरम्यान, शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी चर्चा करून दिंडोरी पोलिसांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार गुटिया अब्दुल सय्यद, अस्लम रफिक सय्यद, शाहनूर मिसऱ्या सय्यद, समीर गुलाब सय्यद, इजाज गुलाब सय्यद, दीपक मेहताब सय्यद आणि शाहरूख मेहताब सय्यद या सात संशयितांवर गुन्हा दाखल झाला आहे. दिंडोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक राजेंद्र लहारे यांच्या तक्रारीनुसार गुरुवारी 29 उंटांचा जत्था वणी येथून दिंडोरी हद्दीतील कळवण रोडवर आला. त्यावेळी पोलीस निरीक्षकांच्या तोंडी आदेशाने पोलिसांनी संशयितांकडे विचारणा केली.
उंटांच्या पायांना जखमा
तसेच सीड फार्मजवळ पोलिसांसमक्ष दिंडोरी पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशुधन विकास अधिकारी डॉ. राहुल कौठळे यांनी 29 उंटांची वैद्यकीय तपासणी केली. त्यात हे उंट तहानलेले आणि अशक्त असल्याचे तसेच त्यांना चालवल्याने उंटांच्या पायांना जखमा झाल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद केले आहे. संशयित उंट मालकांनी उंटांना कमी चारा आणि पाणी देऊन सलग चालवले. त्यामुळे त्यांच्या पायांना ठिकठिकाणी जखमा झाल्या आहेत. उंटांना निर्दयतेने वागणूक दिल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, जखमी उंटांवर उपचार सुरू असून उर्वरित उंट चुंचाळे येथील पांजरापोळ वनक्षेत्रात नेण्यात आले आहेत. तर आतापर्यंत शंभरहून अधिक उंट नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. त्यातील जवळपास सर्वच उंट आहे अशक्त असून वेगवेगळ्या भागातून गोशाळा, पांजरापोळ येथे नेण्यात आले आहेत.