Ramdas Athawale : 'कुणी काढली कळ, तर आमच्या सोबत आहे, छगन भुजबळ', रामदास आठवलेंचा शायराना अंदाज
Ramdas Athawale : 'कुणी काढली कळ, तर आमच्या सोबत आहे, छगन भुजबळ' अशी मिश्किल शायरी आठवलेंनी केली आहे.
Ramdas Athawale : अजित पवार (Ajit Pawar) यांचा निर्णय स्वागतार्ह असून शरद पवार यांनी माझं आणि अजितदादा यांचं ऐकलं असतं, तर फूट पडली नसती, असा खोचक टोला यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athwale) यांनी दिला. अजित दादांचा गट प्रबळ असून मोठा देखील असल्याचे सांगत 'कुणी काढली कळ, तर आमच्या सोबत आहे, छगन भुजबळ' अशी मिश्किल शायरी देखील भुजबळांच्या एंट्रीवर केली आहे.
आज मंत्री रामदास आठवले हे नाशिक (Nashik) दौऱ्यावर असून दुपारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. आठवले म्हणाले की, अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांनी NDA ला पाठिंबा द्यावा. कारण आम्ही 2024 साली निवडणूक जिंकणार आहे. शिवाय देशात पहिल्यांदाच ओबीसी पंतप्रधान लाभला, नरेंद्र मोदी तेली समाजाचे असल्याचे ते म्हणाले. येत्या 19 तारखेला NDA ची बैठक होणार आहे. विरोधी पक्षांच्या एकीला आम्ही सुरुंग लावू, असा इशारा देखील रामदास आठवले यांनी दिला.
नुकताच मंत्रिमंडळ विस्तार झाला. अजित पवार गटाने एंट्री केल्याने नव्याने सरकारमध्ये नव्या मंत्र्यांनी शपथविधी घेतला. आता आगामी मंत्रिमंडळ विस्तारात आम्हाला एक मंत्रीपद मिळावे. आम्हाला पहिल्या विस्तारावेळी संधी मिळायला हवी होती. पण ज्यावेळी पुन्हा विस्तार होईल, तेव्हा मंत्रीपद मिळेल, असे सांगण्यात आले. केंद्रीय मंत्रीमंडळात माझे प्रमोशन होईल की नाही, हे मोदी ठरवतील..माझ्या पक्षाचा खासदार नसल्याने मला वाटत नाही की, मला कॅबिनेट मिळेल..मला जर कॅबिनेट मिळाले, तर नक्कीच भाजपला फायदा होईल. त्यामुळे पुढील लवकर विस्तार करा, अशी नेत्यांकडे मागणी करणार असल्याचे आठवले म्हणाले. तसेच आमचा गट अत्यंत सक्रिय असा गट आहे. आमचा गट नेहमीच दलित आणि बौद्ध समाजाच्या पाठीशी उभा राहिला आहे. त्याचबरोबर देशाचे नेतृत्व मोदी, फडणवीस यांच्या पाठीशी देखील आमचा गट आहे.
आमच्याकडे आहे डोके, त्यामुळे आम्ही देत नाही खोके
दरम्यान नुकतीच अजित पवार गटाने देखील शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभाग घेतला. त्यामुळे आता गेल्या अनेक दिवसांपासून गद्दार, खोके अशा घोषणा होत होत्या, त्या कुठेतरी मागे पडल्याचे चित्र यावर रामदास आठवले हे शायराना अंदाजात म्हणाले की, 'जे म्हणत होते खोके, त्यांचे त्यावेळी फिरले होते डोके, आमच्याकडे आहे डोके, त्यामुळे आम्ही देत नाही खोके' अशी कविताच करून टाकली. त्यावेळी अजित दादा आरोप करत होते, म्हणून त्यांच्यावर खोक्याचे आरोप नाही.
तर फूट पडली नसती....
दरम्यान भाजपबरोबर असलेले मित्रपक्ष नाराज असल्याची चर्चा आहे. यावर आठवले म्हणाले की, माझी कामं होतात, म्हणून मी भाजपा सोबत आहे. सत्तेत जागा देत नाही, हीच अडचण आहे. त्यावेळी जर उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) सोबत आले असते, तर फूट पडली नसती, असे सांगत 2014 ला जशी सेना सोबत आली, तशी 2019 साली येईल, असा अंदाज भाजपाला होता. पण तसं झालं नाही. आता एकनाथ शिंदे, अजित पवार स्वबळावर भाजपसोबत आले आहे. दरम्यान माझा सल्ला होता की, शरद पवार यांनी NDA मध्ये यावे. पण आता काय होत काय माहित. तसेच शरद पवार यांच्या वारसदाराबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी पुन्हा एकदा मिश्कीलपणे उत्तर दिले की,शरद पवार यांचा खरा वारसदार मी आहे'. शरद पवार यांच्याबद्दल मला आदर आहे. त्यांनी मंत्रीपदाची संधी दिली होती. त्यामुळे कुणीही कुणावर जास्त फार आरोप प्रत्यारोप करू नये, असा सल्लाही रामदास आठवले यांनी दिला.