(Source: ECI/ABP News/ABP Majha)
MPSC चा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू होणार, शिंदे फडणवीस सरकारच्या निर्णयाने विद्यार्थ्यांना दिलासा
MPSC News :एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याचा शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या राज्यभरातील उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. थोड्यात वेळात याबाबत अधिकृत घोषणा होईल.
MPSC News : एमपीएसी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आलं आहे. एमपीएससीचा (MPSC) नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याचा शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde Fadnavis Govt) घेतला आहे. या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या राज्यभरातील उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. थोड्यात वेळात याबाबत अधिकृत घोषणा होईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा प्रश्न मंत्रिमंडळ बैठकीत मांडला. त्यानंतर इतरही मंत्र्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना अवगत केले आणि हे नियम 2025 पासून लागू करण्याची विनंती केली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडून तत्वतः मान्यता मिळाल्याची माहिती आहे.
सरकारच्या या निर्णयानंतर आंदोलक विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. "विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी केलेल्या आंदोलनाचा हा विजय आहे. आजचा दिवस आमच्यासाठी दिवाळीसारखा आहे. या निर्णयासाठी सरकारचे आभार मानतो. आता जोमाने अभ्यासाला लागू," अशी प्रतिकिया आंदोलक विद्यार्थ्यांनी दिली. यासोबतच आंदोलनात सहभादी झालेले आमदार गोपीचंद पडळकर, अभिमन्यू पवार तसंच या मागणीचा पाठपुरावा करणारे आमदार रोहित पवार यांनी देखील सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
पुण्यात विद्यार्थ्यांचं आंदोलन
यूपीएससीच्या (UPSC) धर्तीवर नवीन अभ्यासक्रम यावर्षी लागू न करता तो 2025 पासून लागू करावा या मागणीसाठी पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन केलं होतं. अलका टॉकीज चौकात अराजकीय साष्टांग दंडवत आंदोलन करण्यात आले आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अलका टॉकीज चौकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 13 जानेवारीला देखील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. आज एमपीएससीचे विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर आले होते.
विद्यार्थ्यांची मागणी काय होती?
यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएससी परीक्षेचा अभ्यासक्रम यावर्षी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु या निर्णयाचा फटका राज्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बसू शकतो. नवीन अभ्यासक्रम आम्हाला मान्य आहे परंतु तो यंदा लागू न करता 2025 पासून लागू करण्यात यावा अशी मागणी करत विद्यार्थी आंदोलनाला बसले होते.
MPSCच्या विद्यार्थ्यांची व्यथा पडळकरांनी फोनद्वारे फडणवीसांना सांगितली
आंदोलनाच्या ठिकाणी भाजपचे अभिमन्यू पवार आणि गोपीचंद पडळकर हे देखील उपस्थित होते. आमदार गोपीचंद पडळकर यांनी या आंदोलनादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बातचीत करत विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडले. यावेळी फडणवीस यांनी हा विषय आज मंत्रिमंडळ बैठकीत मांडला जाईल आणि निर्णय घेऊ अशी आश्वासन दिलं होतं.
संबंधित बातमी
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI