परदेशी वृक्ष ठरतायत तापमानवाढीस कारणीभूत; अभ्यासकांचा दावा
देशात मार्च आणि एप्रिल महिन्यातील तापमानचे अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. या तापमानवाढीला अनेक कारणं असली तरी आणखी एक कारण समोर आलंय ते म्हणजे परदेशी झाडं
मुंबई : सध्या राज्यात तापमानाचा पारा चांगलाच वाढत आहे. उन्हाचा चटका वाढत असल्याने नागरिक हैराण होत आहेत. या तापमानवाढीची अनेक कारणं समोर आली आहेत. मात्र, अशातच परदेशी वृक्षांची संख्या वाढल्याने देखील स्थानिक पातळीवर तापमानवाढ होत असल्याचा दावा अभ्यासकांनी केला आहे.
देशात मार्च आणि एप्रिल महिन्यातील तापमानचे अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. या तापमानवाढीला अनेक कारणं असली तरी आणखी एक कारण समोर आलंय ते म्हणजे परदेशी झाडं. परदेशी झाडांमुळे देखील तापमानवाढ होत असल्याचा दावा काही अभ्यासकांनी केलाय. 'नेचर फॉर एव्हर सोसायटी' या पर्यावरणासाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थेनं हा दावा केलाय. भारतात 15 हजारांहूनअधिक झाडांच्या प्रजाती या परदेशी असल्याचं देखील अभ्यासक म्हटले आहे.
काय आहेत कारणं?
ऐन उन्हाळ्यात परदेशी झाडांची मोठ्या प्रमाणात पानगळ होत असते. त्यामुळे एप्रिल, मे महिन्यात सूर्याची किरणे थेट जमिनीवर पडतात. यामुळे जमिनीची उष्णता वाढते आणि तापमानात बदल होतो. परदेशी झाडांपैकी 55 टक्के झाडांच्या प्रजाती या मूळ अमेरीकेतील आहेत. बॉटनिक गार्डनच्या विकासासाठी इंग्रजांच्या काळात आपल्याकडे परदेशी झाडे आणली गेली आणि तेच पुढील काळात देखील चालत राहिलं. मात्र, याला कोणताही वैज्ञानिक आधार नसल्याचा दावा अभ्यासकांनी केलाय
परदेशी झाडांची पानगळ ही प्रामुख्याने उन्हाळ्यात होत असते. त्यामुळे सूर्यकिरण थेट जमिनीवर आदळत असल्यानं जमीनीचंतापमान वाढतं आणि याचंच कारणं आहे की स्थानिक पातळीवरील तापमान वाढ रोखण्यात परदेशी झाडे निरूपयोगी ठरतात असादावा आहे. सोबतच, विदेशी झाडांवर पक्षी बसत नाहीत, घरटे देखील बनवत नाहीत. सौंदर्यीकरणासाठीच ह्या झाडांचा अधिक वापर होत असल्याचं देखील अभ्यासकांचे निरीक्षण आहे.
परदेशी झाडं कोणती?
गुलमोहर, पेंटाफोरम, विलायती शिरीष (रेन ट्री), काशीद, नील मोहोर, चिंचेचं झाड इत्यादी
देशी झाडं कोणती?
वड, पिंपळ, बेहडा, अशोका, कडू लिंब, जारुल, जांभूळ, फणस इत्यादी.
मात्र, यावर काही पर्यावरणवादी अभ्यासकांनी असमर्थता दर्शवली आहे. झाडं कोणतीही असो ती सावली देतात. प्रामुख्याने शहरातील परिसंस्था या मानवनिर्मित आहेत अशात शहरी भागातील झाडं ही सौंदर्यीकरणासाठी असतात. परदेशी झाडं चांगली नाहीत किंवा त्यामुळे तापमानवाढ होते असं म्हणणेच चुकीचं आहे, ते देखील प्रकाश संश्लेषण करत असतात. देशी झाडं ही चांगलीच आहेत, मात्र फळांच्या झाडांची न्यूसेन्स व्हॅल्यू अधिक असते, असे वनस्पती अभ्यासक डॉ. सी.एस. लट्टू म्हणाले.
मुंबईबद्दल बोलायचं झालं तर मुंबईत 75 टक्के झाडं ही परदेशी आहे. शिवाजी पार्क परिसरातील देखील 50 टक्क्यांहून अधिक परदेशी झाडं असल्याचं अभ्यासक सांगतात. मुंबईत सौंदर्यीकरणासाठी अनेक ठिकाणी परदेशी झाडांचा वापर केल्याचं बघायला मिळतं. अशात मागील काही वर्षात मुंबईतील तापमानात देखील अनेक बदल अनुभवायला मिळतात. त्या-त्या भागातील आपली एक वृक्षसंपदा असते. अशात स्थानिक भागातील झाडांनाच प्राधान्य दिल्यास तेथील जैवविविधतेवर परिणाम होत नाही. मात्र, अद्यापही देशी झाडांबाबत सरकारी दरबारी अनास्था असल्यानं परदेशी झाडांचाच वापर सौंदर्यीकरणासाठी बघायला मिळतो. परिणामी अनेक शहरांमध्ये अंगाची लाहीलाही होताना बघायला मिळतेय. त्यामुळे यापासून वाचण्यासाठी देशी झाडांची लागवड मोठ्या प्रमाणात झाल्यास याचा अधिक फायदा होईल यात शंका नाही.