(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राज्यातील 170 निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण, मुंबईतील डॉक्टर सर्वाधिक कोरोनाबाधित
रुग्णसेवा देणाऱ्या डाॅक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. मागील तीन दिवसात राज्यातील 170 निवासी डाॅक्टरांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.
मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. राज्याची राजधानी मुंबईतही कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. गेल्या तीन दिवसात राज्यातील 170 निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. महत्त्वाचे म्हणजे मुंबई परिसरातील सर्वाधिक निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे.
जे.जे. रुग्णालयातील 28 निवासी डॉक्टरांना आज कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत .जे. रुग्णालयातील एकूण 50 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. तर नायर रुग्णालयातील 35, केईएम 40, ठाणे 8, धुळे 8, कुपर 7, पुण्यातील ससून रुग्णालय 5, लातूरमध्ये 1, मिरजमधील एका डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याने रुग्णसेवा देताना आरोग्य यंत्रणेवर ताण वाढणार आहे. निवासी डॉक्टरांकडून आजच संप मागे घेण्यात आला आहे. कंत्राटी पद्धतीच्या डॉक्टरांच्या नेमणुकीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नाही त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर अधिक ताण पडणार आहे.
पदव्युत्तरच्या प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांचे नीटचे समुपदेशन रखडल्याने 27 नोव्हेंबरपासून देशभरात निवासी डॉक्टरांनी संप पुकारला होता. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्याशी चर्चा झाल्यानंतर देशातील निवासी डॉक्टरांनी आंदोलन मागे घेतले होते.मात्र, महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांनी संप कायम ठेवला होता. या संदर्भात सेंन्ट्रल मार्डचे अध्यक्ष डॉ. अविनाश दहिफळे यांनी सांगितले होते की, ''जोपर्यंत स्टेट काऊन्सिलिंगचा मुद्दा मार्गी लागत नाही, सोबतच एचओच्या पोस्ट भरल्या जात नाहीत, तोपर्यंत संप सुरुच राहणार.'' त्यानंतर अखेर आज महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांनी संप मागे घेतला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Doctors Strike : महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांचा संपाचा मागे