(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'या' तीन अफवांमुळे झाला छत्रपती संभाजीनगरमधील राडा; SIT च्या तपासात महत्त्वाची माहिती समोर
Chhatrapati Sambhaji Nagar : विशेष म्हणजे तीन महत्वाच्या अफवांमुळे जमाव जमला आणि पुढे त्याचे रुपांतर दगडफेकसह जाळपोळमध्ये झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) किराडपुरा भागात राम नवमीच्या पूर्वसंध्येला दोन गटात वाद झाला होता. त्यानंतर वादाचे रूपांतर दगडफेक आणि जाळपोळीत झाले. यावेळी पोलिसांच्या अनेक वाहने पेटवून देण्यात आल्या, तर काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी देखील यात जखमी झाले होते. दरम्यान हा सर्व राडा कसा झाला याबाबत चौकशी करण्यासाठी पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी एसआयटी पथकाची स्थापना केली आहे. दरम्यान एसआयटीच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. अफवांमुळे झाला छत्रपती संभाजीनगरमधील राडा झाला असल्याचं देखील तपासात समोर आले आहे. विशेष म्हणजे तीन महत्त्वाच्या अफवांमुळे जमाव जमला आणि पुढे त्याचे रुपांतर दगडफेकीसह जाळपोळीमध्ये झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी अनेक माहिती आता समोर येत आहे. तर या सर्व घटनेला फक्त अफवाच कारणीभूत असल्याचे देखील समोर आले आहे. सुरुवातीला दोन गटात किरकोळ वाद झाला. पोलिसांनी हा वाद मिटवला देखील होता. मात्र त्यानंतर काही लोकांनी सोशल मीडियावरुन अफवा पसरवल्या आणि त्यामुळे मोठा जमाव किराडपुरा येथे जमा झाला. "एका गटाच्या तरुणांना नाहक मारण्यात आले आहे, मारेकऱ्यांना पोलिसांनी मंदिरात लपवून ठेवले आहे, शहागंजमध्ये दंगल उसळली आहे," यासह काही अफवा पसरल्यानेच जमाव जमा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता अफवा पसरवणाऱ्या लोकांचा शोध पोलीस घेत आहेत.
आतापर्यंत 79 हल्लेखोर ताब्यात
रामनवमीच्या आदल्या रात्री शहरातील किराडपुऱ्यात दोन गटात वाद झाला होता. या घटनेला 25 दिवस उलटले असून, पोलिसांकडून अजूनही फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे. तर आतापर्यंत एसआयटीने 79 हल्लेखोरांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. तसेच इतर फरार आरोपींना देखील ताब्यात घेण्यासाठी वेगवेगळ्या पथकाकडून कारवाई सुरुच आहे. पोलीस घटनास्थळी असलेल्या आणि परिसरातील इतर भागातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन, हल्लेखोरांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच ज्यांची ओळख स्पष्ट होत आहे, त्यांना ताब्यात घेण्यात येत आहे. मात्र अनेकजण घटना घडल्यापासून भूमीगत झाले आहेत. त्यामुळे पोलीस त्यांच्या देखील शोध घेत आहे. तर काहीजण इतर इतर जिल्ह्यात लपवून बसल्याचे देखील समोर येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: