Abdul Sattar : कृषीमंत्री सत्तारांच्या सिल्लोडमधील 51 हजार 644 शेतकऱ्यांचा अतिवृष्टीचा निधी रखडला
Chhatrapati Sambhaji Nagar: सिल्लोड तालुक्यातील 51 हजार 644 शेतकऱ्यांना अद्यापही अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा निधी मिळाला नसल्याचे समोर आले आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar: गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, सरकराने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच नुकसानीचे पंचनामे झाल्यावर नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याची माहिती देखील सरकराने दिली आहे. पण असे असताना कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्याच सिल्लोड मतदारसंघातील (Sillod Constituency) शेतकऱ्यांना अजूनही ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीचे अनुदान मिळाले नसल्याचे समोर आले आहे. सिल्लोड तालुक्यातील 51 हजार 644 शेतकऱ्यांना अद्यापही निधी मिळाला नसल्याचे समोर आले आहे. यामुळे सिल्लोडमधील शेतकरी संतप्त आहेत.
अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातील सोयगाव तालुक्याला अवकाळी नुकसानीतून वगळण्यात आल्याची माहिती समोर आली असतानाच, आता सिल्लोड तालुक्यातील 51 हजार 644 शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा अनुदान देखील मिळाले नसल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. 2022 मध्ये सिल्लोड तालुक्यातील 51 हजार हजार 644 शेतकऱ्यांचे ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे 40 हजार 861 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे करुन प्रशासनाने शासनाकडे नुकसानीचा अहवाल दिला होता. त्यात सिल्लोड तालुक्याला 55 कोटी 57 लाख 13816 रुपयांची मागणी करण्यात आली होती. याला शासनाने मंजुरीही दिली होती. मात्र सहा महिने उलटूनही शेतकऱ्यांना अनुदानाचे पैसे मिळालेले नाही.
यामुळे होतोय उशीर...
शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची मदत मिळण्यासाठी उशीर होत असून, यासाठी सरकारची नवीन किचकट प्रकिया कारणीभूत ठरत आहे. कारण यापूर्वी तालुक्यात झालेल्या नुकसानीचा अहवाल संबंधित तहसीलदार थेट शासनाला पाठवत होते. त्यानुसार झालेल्या नुकसानीचा निधी थेट तहसील कार्यलयात पाठवले जात होते. पुढे तहसील प्रशासन शेतकऱ्यांच्या यादी बँकेला देऊन खात्यावर पैसे जमा करत होते. मात्र यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्यामार्फत ऑनलाईन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र सिल्लोडच्या महसूल प्रशासनाला अजूनही 18 हजार 413 शेतकऱ्यांची माहिती मिळू शकली नाही. तर ऑनलाईन झालेल्या शेतकऱ्यांच्या यादींमधील अनेकांचे नंबर जुळत नाहीत. त्यामुळे गेल्या सहा महिन्यापासून हा निधी किचकट प्रक्रियेमुळे अडकून पडला आहे.
अवकाळी निधीतून देखील सोयगावला वगळले...
एकीकडे सिल्लोड तालुक्यातील 51 हजार 644 शेतकऱ्यांना अद्यापही अतिवृष्टीचा निधी मिळाला नसल्याचे समोर आले असताना, सत्तार यांच्या मतदारसंघातील सोयगाव तालुक्याला अवकाळी नुकसानीतून वगळण्यात आले आहे. कारण महसूल विभागाने जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या प्राथमिक अहवालात सोयगाव तालुक्यात शून्य टक्के नुकसान झाल्याची लेखी माहिती पाठवली आहे. त्यामुळे कृषीमंत्री यांच्या मतदारसंघातील अशी परिस्थिती असेल तर राज्यात काय अवस्था असेल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :