Maharashtra Politics Jayant Patil: शपथविधी पूर्वी आमदारांची दिशाभूल करुन सह्या घेतल्या; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा दावा
Jayant Patil: अजित पवारांसोबत गेलेल्या काही आमदारांनी दिशाभूल करून स्वाक्षरी घेतली असल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले.
Maharashtra Politics Jayant Patil: कोणतीही माहिती न देता काही कागदांवर स्वाक्षरी केली असल्याचे काही आमदारांनी म्हटले असल्याचे दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला आहे. पक्षात झालेल्या बंडानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने 5 जुलै रोजी तालुका अध्यक्ष, राज्य कार्यकारणीची बैठक बोलावली असून राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे सविस्तर मार्गदर्शन करणार असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले. पक्षाच्या मान्यतेशिवाय, सत्तारुढ पक्षाकडे जाऊन काही आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली असल्याचे पाटील यांनी म्हटले. अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह 9 आमदारांनी मंत्रिपदांची शपथ घेतल्यानंतर आज त्यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
आजच्या पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नवनियुक्त प्रतोद जितेंद्र आव्हाड, आमदार अनिल देशमुख यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. जयंत पाटील यांनी म्हटले की, अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते म्हणून काम करत होते. त्यांनी आज बैठकही घेतली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून आम्ही भूमिका स्पष्ट करत आहोत. पक्षाच्या मान्यतेशिवाय, सत्तारुढ पक्षाकडे जाऊन काही आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. विधिमंडळ पक्षाचा गटनेता म्हणून सांगतो की, बहुसंख्य आमदार, पक्षाचे कार्यकर्ते या घटनेचा निषेध करत आहेत. संताप व्यक्त करत आहेत असेही पाटील यांनी म्हटले.
जयंत पाटील यांनी म्हटले की, ज्या काही आमदारांना बोलावून घेतले, त्यांनी कोणत्या कागदांवर स्वाक्षरी घेतली याची माहिती आम्हाला अद्याप समजली नाही. काही आमदारांनी दिशाभूल झाली असल्याचे म्हटले. बहुमत असतानाही सत्तारुढ पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला. 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यांनी पलिकडे (सत्तारुढ पक्षाकडे) जाण्याची भूमिका घेतली असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या काही आमदारांनी आमच्यासोबत संपर्क साधला असल्याचा दावाही जयंत पाटील यांनी केला.
योग्य वेळी माहिती देऊ
आज ज्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यांना बरीच मोठी आश्वासने देण्यात आली आहेत. ही आश्वासने नेमकी काय आहेत हे योग्य वेळी सांगणार असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले. आठ जणांची काही वेगळी भूमिका होती ते सतत मांडत होते. ईडी चौकशी दरम्यान, मला निरोप आला का? तो विषय वेगळा असून मी नंतर भाष्य करणार असल्याचेही त्यांनी म्हटले.
अजित पवारांना उत्तर देण्यास आलो नाही...
अजित पवार यांनी शपथविधीनंतर घेतलेल्या मंत्रिपदाच्या शपथेनंतर पत्रकार परिषद आपली भूमिका मांडली. याबाबत विचारले असता जयंत पाटील यांनी म्हटले की, अजित पवारांना उत्तर देण्यासाठी ही पत्रकार परिषद घेतली नाही. पक्षाने जितेंद्र आव्हाड यांची मुख्य प्रतोद म्हणून निवड करण्यात आली आहे. याबाबत पक्षाकडून विधिमंडळाला पत्र देण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले.
कारवाई करणार?
पक्षाच्या बंडखोरांवर कारवाई करण्याबाबत जयंत पाटील यांनी म्हटले की, दुपारच्या घटनाक्रमानंतर कायदेशीर बाबींवर विचार करण्यास संधी मिळाली नाही. कारवाई संदर्भात कायदेशीर सल्ला घेऊ पुढील निर्णय घेऊ असेही पाटील यांनी स्पष्ट केले.