अजित पवारांनी बंड केल्यानंतर जितेंद्र आव्हाडांना शरद पवारांनी दिली मोठी जबाबदारी, प्रतोद आणि विरोधीपक्षनेतेपद आव्हाडांकडे
Maharashtra NCP Crisis : एकनाथ शिंदे यांच्या बंडाला वर्ष झाल्यानंतर राज्यात आणखी एक बंड झाले. अजित पवार यांनी काही आमदारांना हाताशी घेत राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड केले.
Maharashtra NCP Political Crisis : एकनाथ शिंदे यांच्या बंडाला वर्ष झाल्यानंतर राज्यात आणखी एक बंड झाले. अजित पवार यांनी काही आमदारांना हाताशी घेत राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड केले. अजित पवार आणि आठ आमदारांनी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांकडे उप मुख्यमंत्रिपद सोपवण्यात आले आहे. अजित पवारांनी बंड केल्याचे समोर आल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील नव्या नेत्यांकडे काही जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आणि विरोधी पक्ष नेतेपदी जितेंद्र आव्हाड यांची नेमणूक करण्यात आली आहे.
अनिल पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतोदपद होते. अनिल पाटील हे अजित पवार यांच्यासोबत बंडात सहभागी झाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने जितेंद्र आव्हाड यांच्याकडे ही जबाबदारी दिली आहे.त्याशिवाय अजित पवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी विरोधीपक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने जितेंद्र आव्हाड यांच्याकडे विरोधीपक्षनेतेपद सोपवले आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्याकडे विरोधीपक्षनेतेपद दिल्यामुळे राज्याला मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेता एकाच जिल्ह्यातून मिळाला आहे. एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड हे ठाण्याचे आहेत. एकाच जिल्ह्यातील मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेतेपद होण्याची ही पहिलीच घटना असेल.
माझा व्हीप सर्वांना लागू होईल - जितेंद्र आव्हाड
आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्याकडे आहे. त्यांनी माझी प्रतोद आणि विरोधीपक्षनेतेपदी निवड केली आहे. मी जे व्हीप काढेल ते त्यांना लागू होईल, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. 25-25 वर्ष मंत्रिपदे भोगली. ज्या नेत्याने पराकाष्ठ केली ते पद तुम्हाला दिली. या माणसाला या वयात ज्याचा अखेरचा काळ आहे,
त्या बापाला अश्या परिस्थितीमध्ये आणणं हे माणुसकीला पटणार नाही, असा संताप जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला. मी मेलो तरी शरद पवार यांना सोडणार नाही, असेही आव्हाड म्हणाले.
चर्चा काय होती माहीत नाही पण निष्ठेला न्याय मिळतो. अवघड स्थितीमध्ये पक्ष असला तर त्याची संधी म्हणून बघितले पाहिजे. शिवसेनेसारखी स्थिती करण्याचा प्रयत्न केला, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
राज्याचे विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडे येणार?
मागील वर्षी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात झालेल्या बंडामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 40 आमदार गेले. तर, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत 16 आमदार राहिले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज झालेल्या बंडामुळे शरद पवार यांच्यासोबत 15 आमदार असल्याची चर्चा आहे. तर, काँग्रेसकडे 45 आमदार आहेत. त्यामुळे विरोधी बाकांवर आता काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत काँग्रेस विरोधी पक्षनेते पदावर दावा करण्याची करण्याची शक्यता आहे.
मी साहेबांसोबत असल्याचे ट्वीट करत जयंत पाटील यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेससोबत असल्याचे सांगितलेय.
मी साहेबांबरोबर... pic.twitter.com/npZZVEvKk2
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) July 2, 2023