Vidhan Parishad Election : एक-दोन नव्हे, महाविकास आघाडीची तब्बल 96 मतं फोडली, भाजपने दोन्ही जागा कशा जिंकल्या?
BJP won MLC Election Maharashtra : विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने विजय मिळवल्यानंतर महाविकास आघाडीला अधिक आत्मपरिक्षण करावे लागणार आहे.
Maharashtra Vidhan Parishad Election 2021 : नागपूर आणि अकोला अकोला-वाशिम-बुलढाणा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला. या निवडणुकीत भाजपने आपली मते फक्त राखलीच नाहीत तर महाविकास आघाडीची 96 फोडली असल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले आहे. हा महाविकास आघाडीला मोठा धक्का असल्याचे समजले जात आहे.
नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपकडे विजयासाठी आवश्यक संख्याबळ होते. मात्र, काँग्रेसने या चमत्कार घडवण्याचा दावा केला होता. त्यांचा दावा हवेत राहिला. काँग्रेस-महाविकास आघाडीची 16 मते फुटली. भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांना 362 मते मिळाली. तर, काँग्रेसचे उमेदवार मंगेश देशमुख यांना 186 मते मिळाली. भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले रविंद्र भोयर यांना एक मत मिळाले. मतदानाच्या काही तास आधीच काँग्रेसने रविंद्र भोयर यांचा पाठिंबा काढत देशमुख यांना मतदान करण्याचे आवाहन केले होते. काँग्रेसमध्ये उमेदवार निवडी करूनच गोंधळ असल्याचे चित्र होते. मतदानाच्या काही तासांआधीच उमेदवार बदलण्यात आला. त्यातून काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर मतभिन्नता असल्याचे दिसून आले.
अकोल्यात बाजोरिया पॅटर्न मोडीत
अकोला अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघातील बाजोरिया पॅटर्न भाजपने मोडीत काढला. या मतदारसंघातून भाजपने अकोल्यातील सुप्रसिद्ध उद्योगपती आणि नितीन गडकरींचे कट्टर समर्थक वसंत खंडेलवाल यांना उमेदवारी दिली होती. अकोला महापालिकेसह अनेक नगरपरिषदांमध्ये भाजपची सत्ता आहे. त्यामुळे ताकद वाढलेली भाजपने ही निवडणूक सर्व ताकदनिशी लढवली होती. शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया यांना भाजपने त्यांच्याच पॅटर्नने मात केली असल्याची चर्चा आहे. भाजपने शिवसेना-महाविकास आघाडीची तब्बल 80 मते फोडली असल्याचे म्हटले जात आहे.
भाजपच्या वसंत खंडेलवाल यांनी बाजोरिया यांचा जवळपास 109 मतांनी पराभव केला. तब्बल तीन टर्मपासून आमदार असलेले शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरियांचा पराभव करत भाजपचे खंडेलवाल 'जायंट किलर' ठरले आहेत. खंडेलवाल यांना 443 मते मिळाली. तर, बाजोरिया यांना 334 मते मिळाली. तर, 31 मते अवैध ठरली.
बाजोरिया पॅटर्न होता तरी काय?
बाजोरियांची निवडणूक लढविण्याची पद्धत फार वेगळी आहे. ते विधानपरिषदेच्या निवडणूकीचे 'जाणकार रणनितीकार' समजले जातात. यातून त्यांनी स्वत: तीन निवडणुका जिंकल्या आहेत. तर मुलगा विप्लवला परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून आणण्याची किमया केली आहे. बाजोरिया शेवटपर्यंत विरोधकांसमोर आपले पत्ते उघडत नाहीत. यातून गाफील राहिलेल्या विरोधकांना पराभूत करण्याचं मोठं कौशल्य त्यांच्याकडे आहे. विरोधकांची मतं मोठ्या प्रमाणात फोडत 'क्रॉस वोटींग' घडवून आणण्याची किमया त्यांनी मागच्या तिन्ही निवडणूकांत साधली आहे. मात्र, यंदाच्या निवडणुकीत भाजपने त्यांचा डाव त्यांच्यावर उलटवला असल्याचे म्हटले जात आहे.
विधान परिषदेचा निकाल काय
> नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ
चंद्रशेखर बावनकुळे (भाजप) : 362
मंगेश देसाई (काँग्रेस) : 186
रविंद्र भोयर : 01
अवैध : 5
> अकोला वाशिम बुलढाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ
वसंत खंडेलवाल (भाजप) : 443
गोपीकिशन बाजोरिया (शिवसेना) : 334
अवैध मते : 31
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- भाजपचा महाविकास आघाडीला धक्का; अकोल्यात शिवसेनेचे बाजोरिया यांचा धक्कादायक पराभव
- विधान परिषद निवडणूक: नागपूरमध्ये चमत्कार झालाच नाही, भाजपचा दणदणीत विजय, महाविकास आघाडीची मते फुटली
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha