विधान परिषद निवडणूक: नागपूरमध्ये चमत्कार झालाच नाही, भाजपचा दणदणीत विजय, महाविकास आघाडीची मते फुटली
Vidhan Parishad Election Maharashtra : नागपूर आणि अकोला-बुलडाणा-वाशिम मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. नागपूरमध्ये भाजपने विजय मिळवताना महाविकास आघाडीची मते फोडली.
Nagpur MLC Election Result: विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपचा दणदणीत विजय झाला आहे. भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी अपेक्षित विजय मिळवताना काँग्रेसच्या मतपेढीला सुरुंग लावला. बावनकुळे यांना भाजप आणि मित्रपक्षांची मते मिळालीच शिवाय त्यांनी काही महाविकास आघाडीची मते मिळाली असल्याचे समोर आले आहे.
भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांना 362 मते मिळाली. काँग्रेसने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना 186 आणि भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले नगरसेवक छोटू भोयर यांना एक मत मिळाले. महाविकास आघाडीची जवळपास 16 मते फुटली असल्याचे समोर आले.
राज्याचे लक्ष नागपूरच्या निकालावर लागले होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह भाजप-काँग्रेस नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत लागली होती. भाजपने चंद्रशेखर बावनकुळे यांची उमेदवारी घोषित केल्यानंतर मोठ्या घडामोडी घडल्या. बावनकुळे यांच्या उमेदवारीच्या घोषणेनंतर भाजपात धुसफूस सुरू झाली होती. भाजपचे नगरसेवक छोटू भोयर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवली. मात्र, मतदानाच्या १२ तासांआधी नागपुरात काँग्रेसने छोटू भोयर यांचा पाठिंबा काढून घेतला आणि अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा दिला. फाटाफूट होऊ नये यासाठी भाजपने आपल्या नगरसेवकांना नागपूरमधून बाहेर नेले होते. भाजपने या निवडणुकीत विजयाचा दावा केला आहे. तर, दुसरीकडे काँग्रेस नेत्यांनी चमत्कार होणार असल्याची भविष्यवाणी केली आहे. मतांच्या आकडेवारीनुसार भाजप विजयी होण्याची शक्यता आहे.
अकोल्यातही भाजपचा दे धक्का !
भाजपने महाविकास आघाडीचे, शिवसेनेचे विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया यांचा धक्कादायक पराभव करत 'बाजोरिया पॅटर्न' मोडीत काढला आहे. भाजपच्या वसंत खंडेलवाल यांनी बाजोरिया यांचा जवळपास 109 मतांनी पराभव केला. तब्बल तीन टर्मपासून आमदार असलेले शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरियांचा पराभव करत भाजपचे खंडेलवाल 'जायंट किलर' ठरले आहेत.
>> विधान परिषदेचा निकाल काय
> नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ
चंद्रशेखर बावनकुळे (भाजप) : 362
मंगेश देसाई (काँग्रेस) : 186
रविंद्र भोयर : 01
अवैध : 5
> अकोला वाशिम बुलढाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ
वसंत खंडेलवाल (भाजप) : 443
गोपीकिशन बाजोरिया (शिवसेना) : 334
अवैध मते : 31
इतर महत्त्वाच्या बातम्या: