भयावह! मराठीला अभिजात दर्जा, तिकडे मराठी शाळांना विद्यार्थीग्रहण, पटसंख्या एक आकडी, शाळांना टाळं ठोकण्याची वेळ
मराठी भाषेवर मोठ्या प्रमाणात राजकारण ही होताना दिसत आहे मात्र दुसरीकडे मराठी शाळा टिकविण्यासाठी किंवा त्या सुरू राहण्यासाठी कोणतेही प्रयत्न दिसत नाहीये.

Maharashtra: केंद्र सरकारने नुकताच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्यानंतर अनेकांनी आनंदही साजरा केला. राज्य सरकारही मराठी सप्ताह , मराठी भाषा संवर्धन दिन साजरा करत आहे. मराठी भाषेवरून राजकरणालाही उधाण आलंय! मात्र एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा(Classic Status) मिळाला असला तरी दुसरीकडे राज्यातील मराठी शाळांमध्ये विद्यार्थीच नसल्याने या शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचं धक्कादायक चित्र आहे. मराठी शाळांची पटसंख्या एक आकडी होत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर येत असून मराठी शाळांना विद्यार्थीग्रहण लागलंय. विद्यार्थ्यांअभवी शाळांना टाळं ठोकण्याची वेळ आली आहे. मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची रोडावणारी संख्या संपूर्ण राज्याचा चिंतेचा विषय ठरत आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संस्कृती अगदी खेडोपाडी पोहचत असून याच शाळांमध्ये आपल्या पाल्याला घालावं असा पालकांचाही कल असतो. त्यात शिक्षकांचा अनियमित पगार, घसरलेली पटसंख्या हे ही कारण आहे. परिणामी, मराठी शाळा ओस पडू लागल्यात. (Marathi Schools)
मराठी शाळांची भयावह परिस्थिती
एकट्या बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात 51 तर विदर्भातील 11 जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 986 मराठी माध्यमाच्या शाळा या विद्यार्थी नसल्याने एक आकडी पटसंख्येच्या झाल्या आहेत. राज्यात हजारो मराठी शाळा (6000 पेक्षा जास्त) एक आकडी पटसंख्येवर आल्या आहेत.. म्हणजे पहिली ते चौथी या एकूण चार वर्गात 10 पेक्षा कमी मराठी विद्यार्थी संख्या आहेत व दिवसेंदिवस अनेक मराठी शाळातील विद्यार्थ्यांची संख्या घटत आहेत. दुसरीकडे इंग्रजी माध्यमांच्या शाळा या भरगच्च दिसत आहेत. त्यामुळे मराठी शाळा या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, मराठी भाषेवर मोठ्या प्रमाणात राजकारण ही होताना दिसत आहे मात्र दुसरीकडे मराठी शाळा टिकविण्यासाठी किंवा त्या सुरू राहण्यासाठी कोणतेही प्रयत्न दिसत नाहीये.
पालकांचा इंग्रजीकडे कल का?
स्पर्धेच्या युगात वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि अन्य उच्च शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या प्रवेश परीक्षा इंग्रजीत असतात. भविष्यातील संधींमुळे मराठी पालक आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये घालण्यास प्राधान्य देत आहेत. ग्रामीण भागातसुद्धा इंग्रजी शाळांकडे ओढ वाढत आहे. स्पर्धेच्या युगात अनेक स्पर्धा परीक्षा , वैद्यकीय , अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा या इंग्रजीत घेतल्या जातात म्हणून आमचा पाल्य हा त्यात टिकला पाहिजे म्हणून अनेक पालकांनी आपल्या पाल्यासाठी इंग्रजी माध्यमांच्या शाळांना प्रवेश घेतलाय.असं पालक स्पष्ट सांगतात.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा आनंद एका बाजूला, तर दुसरीकडे राज्यभरात शेकडो मराठी शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद पडण्याच्या उंबरठ्यावर आहेत. एकीकडे शासन मराठी सप्ताह, भाषा संवर्धन दिन साजरा करतंय, मराठीच्या राजकारणालाही उधाण आलंय. पण ज्या मराठी शाळांनी ही भाषा पिढ्यान् पिढ्या जोपासली, त्या शाळांचं भवितव्य मात्र अंधारमय होत चाललंय.
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

