Maharashtra Breaking News 9 August 2022 : देश-विदेशसह राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत...
शिंदे-फडणवीस सरकारचा आज शपथविधी
राज्य मंत्रिमंडळाचा आज शपथविधी होणार असून सकाळी 11 वाजता राजभवन या ठिकाणी 18 मंत्री शपथ घेणार आहेत. यामध्ये शिंदे गटाचे सात मंत्री तर भाजपकडून 11 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिंदे गटाकडून 'हे' मंत्री शपथ घेतील
1) उदय सामंत
2) दादा भुसे
3) संजय शिरसाठ
4) संदीपान भुमरे
5) गुलाबराव पाटील
6) भरत गोगावले
7) शंभूराज देसाई
भाजपकडून आज 11 जणांचा शपथविधी होण्याची शक्यता असून आत्तापर्यंत 9 नावांवर भाजपकडून शिक्कामोर्बत झाल्याची माहिती आहे. उर्वरित दोघांमध्ये एक महिला आमदार शपथ घेणार असल्याची शक्यता आहे.
भाजपकडून 'हे' मंत्री शपथ घेतील
1) चंद्रकांत दादा पाटील
2) राधा कृष्ण विखे पाटील
3) सुधीर मुनंगटीवार
4) गिरिष महाजन
5) सुरेश खाडे, मिरज
6) अतुल सावे
7) मंगल प्रभात लोढा
8) रवींद्र चव्हाण
9) विजयकुमार गावित
बिहारमध्ये राजकीय भूकंप? नितीश कुमार यांनी बोलावली आमदारांची बैठक
जेडीयूचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री आरसीपी सिंह यांनी शनिवारी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. यावरून भाजप आणि जेडीयूच्या नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक वाद सुरु आहेत. यामुळेच बिहारमध्ये भाजप आणि जेडीयूची युती तुटण्याची चिन्हे असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांच्या घरी आज बैठक बोलावली आहे. आज सकाळी 11 वाजता ही बैठक होणार असून बिहारमधील जेडीयू आणि भाजपच्या युतीवर त्यावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे.
जेडीयूची भूमिका पाहता भाजप अजूनही वेट अँड वॉचच्या भूमिकेत दिसत आहे. भाजपच्या जवळच्या सूत्रांनी असं सांगितलं आहे की, भाजप सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. भाजपकडून नितीश कुमार यांचा पक्ष फोडण्याचा कोणताही प्रयत्न केला जाणार नाही. तसेच भाजप आपल्या बाजूने सरकार पाडण्यासाठी कोणतेही प्रयत्न करणार नाही असं भाजपच्या नेत्यांनी स्पष्ट केलं आहे.
राज्यात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता
महाराष्ट्रात 11 ऑगस्टपर्यंत सर्वत्र जोरदार पाऊस पडेल असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. पुढील तीन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीची देखील शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र पुढील 24 तासात तीव्र होत डिप्रेशनमध्ये रुपांतरीत होणार आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने चांगल्या पावसाची शक्यता आहे. विदर्भात आज अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर आज पूर्व विदर्भात जोरदार पावसाची चिन्ह आहे. गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, नागपुरात काही ठिकाणी विजांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. गडचिरोलीत एक-दोन ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज आहे, अशी माहिती नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिली.
कोकणातील पालघर, ठाणे, रत्नागिरी, मुंबई, सिंधुदुर्ग, रायगड तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा आणि विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Nagpur Covid Update : दिवसभरात 97 नवे कोरोनाबाधित, सक्रिय बाधितसंख्या 1075
नागपूरः जिल्ह्यात दिवसभरात 97 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. यापैकी 42 शहरातील तर 55 ग्रामीणमधील आहेत. आजच्या अहवालानंतर जिल्ह्यातील सक्रिय बाधितांचा आकडा 1075वर पोहोचला आहे. मंगळवारी 206 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 54 बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या 1021 बाधित गृहविलगीकरणात आहेत.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा राजीनामा
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यपालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे.
गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी रेड अलर्ट, तर नागपूर, वर्धा, यवतमाळसाठी ऑरेंज अलर्ट
IMD: हवामान विभागाने आज गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी रेड अलर्ट कायम ठेवला आहे. आज भंडारा जिल्ह्यासाठीही हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील इतर जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट आहे. त्यामुळे पूर्व विदर्भात काही ठिकाणी पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता आहे.
रत्नागिरी जिल्ह्याला पावसानं झोडपलं, संगमेश्वर तालुक्यातील भातशेती पाण्याखाली
Ratnagiri Rain : सलग चार दिवस कोकणाला पावसाला झोडपून काढलं आहे. त्यामुळे नदी ओढे यांना पूर आलेला आहे. संगमेश्वर तालुक्यातून वाहणारी बाव नदी दुथडी भरुन वाहत आहे. त्यामुळं भातशेती पाण्याखाली गेली आहे. तर नदीकाठच्या गावांना देखील काही प्रमाणात धोका आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ शकते.
गोंदियात मॅरेथॉन स्पर्धेत चक्क बकरीचाही सहभाग
जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने गोंदियातील देवरी येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हजारो स्पर्धकांनी सहभाग नोंदविला असून विशेष म्हणजे परिसरातील बकरी सुद्धा यात धावताला दिसली. चक्क 3 किमीचा प्रवास बकरीने केल्यानं हा कुतूहलाचा विषय ठरला आहे.