Chandrapur News : ..अन् आंदोलकांनी थेट दारू दुकानासमोर थाटला चहा विक्रीचा स्टॉल! चर्चांना उधाण, नागरिकही आश्चर्यचकित
Chandrapur News : दारू दुकान अधिकृत असल्याचा दाखला मनपाकडून घेणे आवश्यक असतानाही राज्य उत्पादन शुल्क विभागाने जाणीवपूर्वक या नियमाला बगल देण्याचे काम केले.

Chandrapur News : चंद्रपुरात देशी दारू दुकानावरून पुन्हा एक जनआंदोलन उभे राहिले आहे. दत्तनगर येथील दारू दुकानासमोर चहा विक्रीचा स्टॉल सुरू करून राजकीय पक्ष आणि स्थानिक नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला. चंद्रपूर शहरातल्या दत्तनगर भागातील या देशी दारू दुकानाला तातडीने बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. नागपूर रोड वर असलेला दत्तनगर हा मध्यमवर्गीय लोकवस्तीचा भाग आहे. याच भागात असलेल्या एका रहिवासी इमारतीत काही दिवसांपूर्वी एक देशी दारूचे दुकान सुरु करण्यात आले. हे दुकान स्थानिक नागरिक आणि नगरसेवक प्रदीप देशमुख यांनी आंदोलन करून बंद पाडले. मात्र हे दुकान दुसरी कडे स्थानांतरित होत नसल्याने आज या लोकांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले. मुख्य म्हणजे या आंदोलनात जनविकास पक्षासोबतच सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सामील झाले होते.
नागरी वस्तीत दारूची दुकानं
काही दिवसांपूर्वी दाताळा रोड वरील जगन्नाथ बाबा नगर येथे देखील अशाच प्रकारे नागरी वस्तीत देशी दारूचे दुकान सुरु करण्यात आले होते. या भागातील नागरिकांनी देखील आंदोलन करून हे दुकान बंद पाडले. विशेष म्हणजे नागरी वस्तीत ही दारूची दुकानं सुरु करतांना या इमारतींना व्यावसायिक बांधकाम दाखवून परवानगी दिली गेली आहे. त्यासाठी महानगरपालिकेच्या ना हरकत प्रमाणपत्राची अट देखील डावलण्यात आली आहे. त्यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होताच महापौर राखी कंचर्लावार आणि उपमहापौर राहुल पावडे यांनी या दुकानांना महानगरपालिकेने कुठलीच परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट केले. उपमहापौर राहुल पावडे यांनी तर जगन्नाथ बाबा नगर येथील दारू दुकानाविरोधात सक्रिय आंदोलन देखील केले.
स्थायी समितीच्या सभेत या विषयावर वादळी चर्चा
चंद्रपूर मनपाच्या गुरुवारी झालेल्या अखेरच्या स्थायी समितीच्या सभेत या विषयावर वादळी चर्चा झाली. स्थायी समितीचे सदस्य पप्पू देशमूख यांनी निवासी वापराच्या जागेमध्ये वाणिज्य वापर करीत दारू दुकान थाटल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर तातडीने कठोर कारवाई करण्याचे आदेश स्थायी समिती अध्यक्ष संदीप आवारी यांनी प्रशासनाला दिले. मात्र उपायुक्त अशोक गराटे यांनी कारवाई संदर्भात उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या स्थायी समिती सदस्य पप्पू देशमुख यांनी आयुक्तांच्या दालनातच ठिय्या आंदोलन केले. चंद्रपूर शहराच्या विविध भागात निवासी जागेत दारूच्या दुकानांना परवानगी देऊन त्याचा वाणिज्य वापर सर्रासपणे सुरू आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जाणीवपूर्वक नियमाला बगल?
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी मनपाच्या अधिकार क्षेत्रात घुसखोरी करत आहेत. दारू दुकानाचे स्थलांतरण करताना दारू दुकान अधिकृत असल्याचा दाखला मनपाकडून घेणे आवश्यक असतानाही राज्य उत्पादन शुल्क विभागाने जाणीवपूर्वक या नियमाला बगल देण्याचे काम केले. त्यामुळे आगामी काळात चंद्रपूर महानगरपालिका विरुध्द उत्पादन शुल्क विभाग असा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे. मात्र सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील असलेला हा मुद्दा सर्व राजकीय पक्षांनी मतभेद विसरून हातात घेणे आवश्यक आहे.























