Maharashtra Lockdown | लॉकडाऊन की कडक निर्बंध, नेमकं काय बदलणार?
राज्यातील लॉकडाऊनची परिस्थिती अधिक गडद होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला संबोधत केलेल्या भाषणानं मात्र हे चित्र काही अंशी बदलल्याचं दिसून आलं.
Maharashtra Lockdown महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा आणि आरोग्य विभाग अतोनात प्रयत्न करत आहेत. पण, त्यांच्या या प्रयत्नांना बऱ्याच अंशी अपयश येताना दिसत आहे. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला. राज्य शासनाच्या मंत्रीमंडळातील बैठकीतही अनेक मंत्र्यांनी याबद्दलचाच आग्रही सूर आळवला आणि लॉकडाऊनची अधिकृत घोषणा होणं तितकं प्रतिक्षेत असल्याचं दिसून आलं.
(Maharashtra) राज्यातील लॉकडाऊनची परिस्थिती अधिक गडद होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला संबोधत केलेल्या भाषणानं मात्र हे चित्र काही अंशी बदलल्याचं दिसून आलं. ज्यानंतर पूर्ण लॉकडाऊनऐवजी सध्या लागू असणारे निर्बंध आणखी कडक केले जाणार असल्याची तयारी दिसून येत आहे.
नव्या नियमावलीअंतर्गत काय बदल होणार?
राज्यात कोरोनाच्या धर्तीवर लागू होणाऱ्या नव्या नियमावलीअंतर्गत 'ब्रेक दि चेन' नियमावलीच्या दृष्टीनं, अत्यावश्यक सेवांची दुकानं सकाळी 7 ते 11 याच वेळेत सुरु असणार आहेत. याव्यतिरिक्त इतर सर्व दुकानं बंद असतील. सायंकाळपर्यंत याबाबतची अधिकृत नियमावली समोर येणार आहे.
विमान प्रवास आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात काहीही बदल होणार नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार राज्यातील वाहतुक पूर्णपणे बंद करण्याच्या कोणत्याही बेतात खुद्द मुख्यमंत्रीही नाहीत.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये कर्मचारी संख्या कमी करण्यात आली असून, हे प्रमाण 10 ते 15 टक्क्यांवर आणलं जाण्याची दाट शक्यता आहे. तर, सार्वजनिक वाहतुकीमध्ये फक्त अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच परवानगी दिली जाऊ शकते.
थोडक्यात सध्या लागू असणाऱ्या निर्बंधांना अधिक कठोर करत त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी होत आहे की नाही, यावर यावेळी प्रशासन भर देणार असून, पूर्ण लॉकडाऊनची शक्यता काही अंशी कमी दिसत आहे.