Maharashtra Kesari 2023 : पोलिस शिपायाकडून महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील पंचांना धमकी? सिकंदर शेखविरोधात चार गुण दिल्याचा आरोप
Maharashtra Kesari 2023 : महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या माती गटातील अंतिम लढतीत महेंद्र गायकवाड याला पंचांनी चुकीच्या पद्धतीने चार गुण दिले आणि पैलवान सिकंदर शेख याच्यावर अन्याय केला अशा भावना सोशल मीडियावरून व्यक्त होत आहेत.
Maharashtra Kesari 2023 : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पैलवान सिकंदर शेख विरोधात चार गुण दिल्याने पंच मारूती सातव यांना धमकी देण्यात आलीय. मुंबई पोलिस दलातील शिपाई संग्राम कांबळे यांनी फोनवरून धमकी दिल्याची तक्रार पंच मारूती सातव यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या समिती अध्यक्षांकडे केली असून त्यांच्या तक्रारीनंतर समितीने पुण्यातील कोथरूड पोलिस ठाण्यात संग्राम कांबळे यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. पोलिस शिपाई कांबळे आणि पंच सातव यांच्यातील फोन रेकॉर्डिग सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. दरम्यान, संग्राम कांबळे यांनी कोणालाही धमकी दिली नसल्याचे पैलवान सिकंदर शेख याने म्हटले आहे.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या माती गटातील अंतिम लढतीत महेंद्र गायकवाड याला पंचांनी चुकीच्या पद्धतीने चार गुण दिले आणि पैलवान सिकंदर शेख याच्यावर अन्याय केला अशा भावना सोशल मीडियावरून व्यक्त होत आहेत. यात पंच मारूती सातव यांची चूक असल्याचे म्हटले जात आहे. या कुस्तीचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असून सिकंदर शेख याच्यावर अन्याय झाल्याची चर्चा आहे. याच प्रकरणात पोलिस शिपाई संग्राम कांबळे यांनी सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्या कुस्तीतील पंच मारुती सातव यांना फोन करून धमकी दिल्याची तक्रार पंच सातव यांनी दिलीय. सातव यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या समिती अध्यक्षांकडे तक्रार अर्ज दाखल केला असून या याप्रकरणी महाराष्ट्र केसरी स्पर्धा समितीकडून कोथरूड पोलिसांकडे तक्रार देण्यात आली आहे.
दरम्यान, संग्राम कांबळे यांनी कोणालाही धमकी दिली नाही. त्यांनी फक्त हे योग्य झाल का असा प्रश्न विचारला आहे, असं पैलवान सिकंदर शेखर यांने म्हटले आहे. "माझ्यावर अन्याय झाला हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलंय. पुढच्या वर्षी महाराष्ट्र केसरीची गदा कोल्हापुरात आणणार. टांग मारताना ज्या नियमाने गुण द्यायला पाहिजे तसं झालं नाही. व्हिडीओ सर्व बाजुंनी पाहू दिला नाही. कोच यांनी दाद मागितली पण त्यांना देखील काही बोलू दिलं नाही. संग्राम कांबळे यांनी कुणाला धमकी दिली नसून फक्त हे योग्य झालं आहे का असा प्रश्न केलाय, असे सिकंदर सेख याने म्हटले आहे.
सेमीफायनलमध्ये सिकंदर शेखरव अन्याय झाल्याने चाहुबाजूने त्याच्या पाठीशी चाहते उभे ठाकले आहे. यावर स्वतः सिकंदरने देखील भाष्य केलं आहे. महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदार म्हणून सिकंदर शेखकडे ही अनेकांच्या नजरा होत्या. मात्र, सेमिफायनलमध्ये त्याच्यावर पंचांनी अन्याय केला, अशा आशयाची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाडकडून सिकंदरला पराभव स्वीकारावा लागला. पण या पराभवाचे शल्य असल्याचं सिकंदरने म्हटलं असून अन्याय झाल्याचं अप्रत्यक्षरीत्या म्हटलं आहे. मात्र कुस्तीचा प्रवास इथंच थांबलेला नसून पुढील महाराष्ट्र केसरी जिंकून दाखवेल, असा विश्वास ही त्याने व्यक्त केला आहे.
काय म्हणाला सिकंदर शेख?
मी सोशल मीडियावरील सर्व प्रतिक्रिया पाहिल्या आहेत. मी या प्रेमाबद्दल सर्वांचा आभारी आहे. त्यांना वाटतंय की मी महाराष्ट्र केसरी व्हायला हवं होतं. अनेकांना धक्का बसला आहे. आज कुस्ती कळत नाही असं कुणी महाराष्ट्रात नाही, अन्याय झाला की नाही झाला याबद्दल तुम्ही सोशल मीडियावर पाहू शकता. मी सर्वांना आवाहन करतो की आपलं प्रेम कायम असू द्या. तुम्ही माझ्यासाठी रडलात, मी आश्वासन देतो की नक्की महाराष्ट्र केसरी जिंकून दाखवेन, असंही सिकंदर म्हणाला.
नक्की काय आहे प्रकरण?
माती विभागातील सोलापूरचा सिकंदर शेख आणि पुण्याचा महेंद्र गायकवाड यांच्यात उपांत्य सामना पार पडला होता. महेंद्र गायकवाडने दुसऱ्या फेरीत 4 गुण मिळवत सिकंदर शेखवर 5-4 अशी आघाडी घेतली. पण महेंद्र गायकवाडने लावलेली बाहेरील डांग हा डाव ही व्यवस्थीत झाला नव्हता. मग महेंद्रला चार गुण कशाचे दिले गेले? असे प्रश्न अनेकांनी उपस्थित केले आहेत. याचाच जाब विचारण्यासाठी संग्राम कांबळे यांनी थेट पंच मारुती सातव यांना फोनवरून धमकी दिल्याचा आरोप सातव यांनी केलाय.
महत्वाच्या बातम्या
Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरी विजेत्यावर बक्षीसांचा वर्षाव; मानाची गदा, थार अन् बरंच काही...