HSC Results : येत्या सोमवार-मंगळवारपर्यंत राज्य मंडळाच्या बारावी परीक्षेचे निकष जाहीर होण्याची शक्यता
येत्या सोमवार किंवा मंगळवारपर्यंत राज्य मंडळाच्या बारावी परीक्षेचे निकष जाहीर होण्याची शक्यता आहे. सीबीएसईनंतर आता राज्य मंडळाच्या बारावी परीक्षेचे निकष तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
मुंबई : सीबीएसईनंतर आता राज्य शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेच्या निकालाचे निकष तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या सोमवारी (21 जून) किंवा मंगळवारपर्यंत (22 जून) राज्य मंडळाच्या बारावी (एचएससी) परीक्षेच्या निकालाचे निकष जाहीर होण्याची शक्यता आहे.
राज्य शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचे निकष काय असतील? याबाबत राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण मंडळ (SCERT) निकष तयार करण्याचे काम करत आहे. आतापर्यत शिक्षण विभागाच्या बारावी परीक्षेच्या निकष ठरवण्याबाबत सात बैठका झाल्या आहेत. शिक्षणमंत्री, सचिव, शिक्षण विभागातील अधिकारी आणि शिक्षण तज्ज्ञ यांच्याशी चर्चा करुन बारावी परीक्षेच्या निकषांबाबतचे काम अंतिम टप्प्यात आलं आहे.
सीबीएसईप्रमाणे दहावी, अकरावी ,बारावीचे गुण अंतर्गत मूल्यमापनासाठी ग्राह्य धरले जातील का? असा प्रश्न असला तरी राज्य मंडळाने तयार केलेला निकष काही प्रमाणात सीबीएसईपेक्षा वेगळा असणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शिक्षण विभागाची उद्या होणाऱ्या महत्त्वाच्या बैठकीत यावर चर्चा होणार आहे. निकालाच्या निकषांवर अंतिम निर्णय घेऊन लवकरच सोमवार किंवा मंगळवारपर्यंत हा निर्णय जाहीर केला जाईल.
कसा आहे सीबीएसईचा फॉर्म्युला?
बारावीच्या मूल्यमापनाचा फॉर्म्युला सीबीएसईकडून सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला असून त्यानुसार सीबीएसई बारावीच्या निकालासाठी दहावी, अकरावी आणि बारावीचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यामध्ये दहावी, अकरावी आणि बारावीचे 30:40:40 टक्के गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. तसेच सीबीएईने 31जुलैपर्यंत बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार असल्याचं जाहीर केलं आहे. सीबीएसईने बारावी बोर्ड परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकष मांडल्यानंतर आदेशानुसार सीबीएसई बोर्डाच्या संकेतस्थळावर मूल्यांकन निकष आणि मूल्यांकन प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केले आहे. तसेच 31 जुलैपर्यंत बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार असल्याचं सरकारने सुप्रीम कोर्टात सांगितलं.
कोरोना महामारीमुळे 1 जून रोजी सीबीएसई बारावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता बारावीच्या परीक्षेचं मूल्यमापन कसं केलं जाणार याची चर्चा सुरु होती. याता त्या संदर्भात सीबीएसईने सर्वोच्च न्यायालयात बारावीच्या परीक्षेच्या मूल्यमापनाचा फॉर्म्युला सादर केला आहे. आता राज्य शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचे निकष काय असतील? याची उत्सुकता आहे.