HSC and SSC Time Table 2022 : दहावी-बारावीचं वेळापत्रक जाहीर, चार मार्चपासून परीक्षा; निकालाची तारीखही ठरली
HSC and SSC Time Table 2022 : उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (HSC) आणि माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC) बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.
उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (HSC) आणि माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC) बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. सर्व संबंधित घटकांशी, शिक्षणतज्ज्ञांशी विचारविनिमय केल्यानंतर वेळापत्रक तयार केल्याचं त्यांनी सांगितलं. चार मार्च 2022 ते सात एप्रिल 2022 या दरम्यान बारावीची लेखी परीक्षा होणार आहे. तर 15 मार्च 2022 ते 18 एप्रिल 2022 यादरम्यान दहावीची परीक्षा होणार आहे. दोन्ही परीक्षा प्रत्यक्ष केंद्रावरच म्हणजेच ऑफलाइन पद्धतीने होणार आहेत. कोरोना महामारीमुळे 25 टक्केंचा अभ्यास याआधीच कपात करण्यात आला आहे. उर्वरित अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नच परीक्षेत विचारले जातील, असे बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
नमस्कार विद्यार्थी व पालक हो,
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) December 16, 2021
सर्व संबंधित घटकांशी, शिक्षणतज्ज्ञांशी विचारविनिमय केल्यानंतर उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (HSC) व माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC) बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक आम्ही जाहीर करत आहोत.#SSCexams #HSCexams @msbshse @CMOMaharashtra @MahaDGIPR pic.twitter.com/ZWwQoKAbV8
प्रात्यक्षिक,श्रेणी व तोंडी/अंतर्गत गुणांची परीक्षा (प्रचलित पद्धतीनुसार) बारावी,दहावीसाठी अनुक्रमे 14 फेब्रुवारी ते 3 मार्च 2022 आणि 25 फेब्रुवारी ते 14 मार्च 2022 याकालावधीत पार पडेल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणमंडळ परीक्षांचे तपशीलवार वेळापत्रक जाहीर करेल, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. दहावी,बारावीच्या आऊट ऑफ टर्न परीक्षार्थींसाठी प्रात्यक्षिक,श्रेणी व तोंडी,अंतर्गत मूल्यमापन परीक्षा तसेच बारावीसाठी माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान ऑनलाईन परीक्षा आणि दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण विषयाच्या (10वी) परीक्षांचा तपशील खालीलप्रमाणे...
कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे काटेकोर पालन करूनच सर्व परीक्षा पार पडतील. तसेच बाराचीचा निकाल जून 2022 च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत आणि दहावीचा निकाल जुलै 2022 च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जाहीर करण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे गायकवाड यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांचे आरोग्य,सुरक्षितता आमची प्राथमिकता आहे. सुरक्षित व पोषक वातावरण प्रदान करण्यासाठी याअगोदर परीक्षा वेळापत्रक,पद्धतीबद्दल राज्यभरातील शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक व मूल्यांकनासंदर्भातील तज्ज्ञांसोबत विस्तृत चर्चा करून त्यांच्या मौल्यवान सूचनांचा समावेश करण्यात आला आहे.