Maharashtra Headlines 16th May : दुपारच्या बातम्यांमध्ये वाचा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी
राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
16 आमदारांच्या निर्णयाआधी शिवसेना कुणाची हा निर्णय घ्यावा लागेल; राहुल नार्वेकरांची माहिती
निर्णय घेताना उशीर केला जाणार नाही तसेच निर्णय घेण्याची घाई देखील केली जाणार नाही, सर्व नियमांमध्ये बसेल असा आश्वासक निर्णय आम्ही घेऊ, असं मत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलं आहे. पुढे बोलताना 16 आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयाआधी शिवसेना कुणाची हा निर्णय घ्यावा लागेल, असंही राहुल नार्वेकर यांनी एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केलं आहे. वाचा सविस्तर
त्र्यंबकेश्वराला धूप दाखवण्याचा आग्रह, गाभाऱ्यात जाण्याचा प्रयत्न नव्हता, उरुस आयोजकांचे स्पष्टीकरण
त्र्यंबकेश्वर शहरातील उरुसाची परंपरा अनेक वर्षांपासूनची असून उरुसातील सेवेकरी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर दरवाजाच्या पायरीजवळ येऊन त्र्यंबकेश्वराला श्रद्धेने धूप दाखवतात आणि पुढे मार्गस्थ होतात. त्या दिवशी धूप दाखवण्यासाठी आलो होतो, उत्तर दरवाजाजवळ जाऊन धूप दाखवण्याचा आग्रह होता. मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्याचा प्रयत्न नव्हता, मात्र यंदाच हा वाद का? असा सवाल उरुस आयोजकांनी उपस्थित केला आहे. दरम्यान या प्रकरणात आता गुन्हा दाखल झाला आहे. वाचा सविस्तर
भरधाव लालपरीची दोन्ही चाकं निखळली, चालकाच्या प्रसंगावधानाने 35 प्रवासी सुखरुप
पुणे-नाशिक महामार्गावर पुन्हा एकदा थरारक अपघात घडला आहे. या अपघाताचा व्हिडीओ प्रचंड धडकी भरवणारा आहे. पुणे-नाशिक महामार्गावर धावणाऱ्या लालपरीची मागची दोन्ही चाके निखळली. त्यातील एक चाक बसच्या पुढे तर एक चाक रस्त्याच्या बाजूला खोल ओढ्यात जाऊन पडले. त्यानंतर बराच वेळ बस तीन चाकांवर धावत होती. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील 35 प्रवासी सुखरुप बचावले आहेत. वाचा सविस्तर
संभाजीनगरात कांद्याला रुपयाचा भाव, शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडत महामार्ग रोखला
गेल्या काही दिवसांपासून कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप आहे. मोठ्या कष्टाने पिकवलेल्या पिकाला रुपया किलो भाव मिळत असल्याने छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर येथील बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा आक्रमकपणा पाहायला मिळत आहे. तर शेतकऱ्यांनी गंगापूर बाजार समितीमध्ये होणारा कांद्याचा लिलाव बंद पाडला आहे. एवढेच नाही तर शेतकऱ्यांनी गंगापूर महामार्गावर उतरत रस्ता बंद पाडला आहे. कांद्याला योग्य भाव देण्याची मागणी करत शेतकऱ्यांनी रास्ता रोको सुरु केला आहे. त्यामुळे रस्त्यावर लांबच लांब वाहनाच्या रांगा पाहायला मिळाल्या. वाचा सविस्तर
विठ्ठल मंदिर समितीने दर्शन रांगेतील भाविकांना मोफत लाडू प्रसाद द्यावा : वारकरी संप्रदाय
विठ्ठल दर्शनासाठी तासनतास दर्शन रांगेत थांबून आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन घेणाऱ्या भाविकाला मंदिर समितीने मोफत लाडू प्रसाद देण्याची मागणी पुन्हा जोर धरु लागली. यानंतर आम्ही यावर विचार करु अशी भूमिका आता मंदिर समितीचे सहध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी घेतली आहे. गोरगरिबांचा देव अशी ओळख असणाऱ्या विठ्ठल मंदिराचे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न आहे. मात्र मंदिर समितीकडून भाविकांना साधा देवाचा प्रसाद देखील मोफत दिला जात नसल्याने भाविकांच्या नाराजीचा सूर आहे. भाविकांच्या पैशावर देवाची तिजोरी भरताना किमान या भाविकांना प्रसाद म्हणून लाडू दिल्यास काय बिघडेल असा सवाल वारकरी पाईक संघाचे रामकृष्ण महाराज वीर यांनी केला आहे. सध्या विठ्ठल मंदिर म्हणजे महसुलाचे कार्यालय झाल्याचा आरोप करत मंदिर समितीने भाविकांसाठी काय केले हे सांगावे असा संतप्त सवाल देखील वीर यांनी केला आहे. वाचा सविस्तर