मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
Electricity Hike : मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. बेस्टने वीज ग्राहकांना नवीन वर्षात दरवाढीची भेट दिली आहे.
Electricity Hike : मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. बेस्टने वीज ग्राहकांना नवीन वर्षात दरवाढीची भेट दिली आहे. याचा फटका मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरातील ग्राहकांना बसणार आहे. बेस्ट, टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटी यांनी वीज नियामक आयोगाकडे पुढील पाच वर्षांसाठीचे दरवाढीचे प्रस्ताव दाखल केले आहेत. त्यानंतर बेस्टने 15 टक्के दरवाढ सुचविल्यानं बेस्टच्या ग्राहकांना नव्या वर्षातच लाइट बिल जादा येणार आहे.
टाटा आणि अदानी यांनी एका वर्षापुरता ग्राहकांना दिलासा दिला असला तरी पुढील वर्षापासून या दोन्ही वीजपुरवठादार कंपन्यांच्या ग्राहकांचा लाइट बिलाचा आकडा वाढणार आहे. तीनही कंपन्यांचे नवे वीजदर मार्चमध्ये जाहीर होऊन एप्रिलमध्ये लागू होणार आहे.
वीज कंपन्यांची प्रत्येकी पाच वर्षांनी वीज दर निश्चिती होते
दरम्यान, वीज कंपन्यांची प्रत्येकी पाच वर्षांनी वीज दर निश्चिती होते. त्याला मल्टी इयर टेरिफ असे म्हणतात. पाचवे वर्ष संपत आले की वीज कंपन्या निर्मिती, वितरण, पारेषण खर्चानुसार महसुली गरज पूर्ण करण्यासाठी वीजदर याचिका आयोगाकडे दाखल करतात. ग्राहकांना दरवाढीच्या प्रस्तावांवर 10 फेब्रुवारीपर्यंत सूचना आणि हरकती दाखल करता येणार आहेत. 2025-26 मध्ये ग्राहकांना सरासरी 15 टक्के दर कपातीचा फायदा मिळेल. तर हरित ऊर्जादरांमध्ये 50 टक्के कपातीचा प्रस्ताव आहे. हे दर प्रति युनिट मागे 66 पैशांवरून 30 पैसे कमी होतील, असे अदानी इलेक्ट्रिसिटीने सांगितले. बेस्ट आणि टाटा चेंबूरच्या वीज निर्मिती केंद्रातून वीज घेतात. ही वीज खूप महाग आहे. मुंबईकरांना कमी दरात वीज द्यायची असेल तर मुंबईबाहेरून स्वस्तात वीज आणावी लागेल. मात्र मुंबईत वीज आणणाऱ्या वाहिन्यांची क्षमता संपली आहे. ही क्षमता वाढवल्याशिवाय बाहेरुन वीज मुंबईत आणता येणार नाही आणि त्याशिवाय विजेचे दर कमी करता येणार नाहीत.
सध्या वीज कंपन्यांचे दर किती?
अदानी इलेक्ट्रिसिटी
युनिट आता नंतर
0 ते 100 3.80 3.45
101 ते 300 6.50 5.95
301 ते 500 8.50 6.90
501 हून अधिक 9.80 6.90
टाटा पॉवर
युनिट आता नंतर
0 ते 100 2.18 2.15
101 ते 300 5.36 5.35
301 ते 500 11.62 9.20
501 हून अधिक 12.56 10.50
बेस्ट
युनिट किती दरवाढ
0 ते 100 2
101 ते 300 5.55
301 ते 500 9.45
501 हून अधिक 11.55