Pune Accident : भरधाव बसची दोन्ही चाकं निखळली, चालकाच्या प्रसंगावधानाने 35 प्रवासी सुखरुप; थरारक अपघाताने प्रवासी धास्तावले...
पुणे-नाशिक महामार्गावर धावणाऱ्या लालपरीची मागची दोनी चाके निखळली. त्यातील एक चाक बसच्या पुढे तर एक चाक रस्त्याच्या बाजूला खोल ओढ्यात जाऊन पडले.
Pune Accident : पुणे-नाशिक महामार्गावर पुन्हा एकदा (Pune-Nashik Highway) थरारक अपघात घडला आहे. या अपघाताचा व्हिडीओ प्रचंड धडकी भरवणारा आहे. पुणे-नाशिक महामार्गावर धावणाऱ्या लालपरीची मागची दोन्ही चाके निखळली. त्यातील एक चाक बसच्या पुढे तर एक चाक रस्त्याच्या बाजूला खोल ओढ्यात जाऊन पडले. त्यानंतर बराच वेळ बस तीन चाकांवर धावत होती. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील 35 प्रवासी सुखरुप बचावले आहेत.
नेमकं काय घडलं?
पुणे-नाशिक महामार्गावर धावणाऱ्या लालपरीची (ST Bus) मागची दोन्ही चाके निखळली होती. त्यातील एक चाक बसच्या पुढे तर एक चाक रस्त्याच्या बाजूला खोल ओढ्यात जाऊन पडले. बस तिरकी होऊन रस्त्यावरच तिरपी धावत गेली. या दरम्यान बसचा खालचा भाग घासत गेल्याने मोठ्या ठिणग्यादेखील उडाल्या. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील 35 प्रवासी नशीब बलवत्तर म्हणून बचावले आहेत. आंबेगाव तालुक्यातील शेवाळवाडीतला हा थरार अनेक प्रवाशांनी आज अनुभवला आहे.
प्रवाशांना नाहक त्रास
परेल डेपोची बस क्रमांक MH20-BL 3618 बस परेल वरुन नारायणगावकडे निघाली होती. बसमध्ये जवळपास 35 प्रवासी होते. आंबेगाव तालुक्यातील शेवाळवाडी हद्दीत मोरडे चॉकलेट कारखान्याजवळ ही घटना घडली आहे. राज्य परिवहन महमंडळाची एसटी बसची चाकं निखळल्यामुळे बसमधील प्रवाशांना मात्र नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
घटनेचा थरारक व्हिडीओ
या अपघाताचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत बसची दोन्ही चाकं निघून गेल्यावर बस तीनच चाकांवर घासत पुढे जात होती. घासत गेल्यामुळे ठिणग्या उडत होत्या. मात्र चालकाच्या हे लक्षात आल्यावर त्याने प्रयत्नांची पराकाष्टा करत बस थांबवली आणि सुदैवाने सगळे प्रवासी बचावले आहेत. पुणे-नाशिक महामार्गावर मागील काही दिवसांपासून अपघाताचं प्रमाण वाढलं आहे. अपघाताला आळा घालण्यासाठी उपाययोजना सुरु आहेत, मात्र अपघात थांबण्याचं नाव घेत नाही.
अपघात कधी थांबणार?
पुणे जिल्ह्यात अपघाताच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. रोज अपघाताच्या घटना समोर येत आहेत. त्यात अनेकांचे नाहक जीव जात आहेत. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्व पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. मात्र अपघाताच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. वेग, रस्ते या अपघातासाठी कारणीभूत ठरत असल्याचं आतापर्यंतच्या अपघातातून समोर आलं आहे. योग्य उपाययोजना राबवून हे अपघात रोखणं प्रशासनासमोर मोठं आव्हान आहे.