Pandharpur News : कोट्यवधी रुपये मिळवणाऱ्या विठ्ठल मंदिर समितीने दर्शन रांगेतील भाविकांना मोफत लाडू प्रसाद द्यावा, वारकरी संप्रदायाची मागणी
Pandharpur News : विठ्ठल दर्शनासाठी तासनतास दर्शन रांगेत थांबून आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन घेणाऱ्या भाविकाला मंदिर समितीने मोफत लाडू प्रसाद देण्याची मागणी पुन्हा जोर धरु लागली.
Pandharpur News : विठ्ठल (Vitthal) दर्शनासाठी तासनतास दर्शन रांगेत थांबून आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन घेणाऱ्या भाविकाला मंदिर समितीने मोफत लाडू प्रसाद (Laddu Prasad) देण्याची मागणी पुन्हा जोर धरु लागली. यानंतर आम्ही यावर विचार करु अशी भूमिका आता मंदिर समितीचे सहध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी घेतली आहे. गोरगरिबांचा देव अशी ओळख असणाऱ्या विठ्ठल मंदिराचे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न आहे. मात्र मंदिर समितीकडून भाविकांना साधा देवाचा प्रसाद देखील मोफत दिला जात नसल्याने भाविकांच्या नाराजीचा सूर आहे. भाविकांच्या पैशावर देवाची तिजोरी भरताना किमान या भाविकांना प्रसाद म्हणून लाडू दिल्यास काय बिघडेल असा सवाल वारकरी पाईक संघाचे रामकृष्ण महाराज वीर यांनी केला आहे. सध्या विठ्ठल मंदिर म्हणजे महसुलाचे कार्यालय झाल्याचा आरोप करत मंदिर समितीने भाविकांसाठी काय केले हे सांगावे असा संतप्त सवाल देखील वीर यांनी केला आहे.
सुटे लाडू विकत घेण्याची भाविकांवर वेळ
यातच मंदिर समितीने विठ्ठलाचा लाडू प्रसाद टेंडर न काढता समितीकडूनच करण्याचा निर्णय घेतल्याने हे तोट्याचे कुराण कोणासाठी सुरु आहे असा सवाल आता सामाजिक कार्यकर्ते विचारु लागले आहेत. पूर्वी विठुरायाचा प्रसाद म्हणून चिरमुरे बत्तासे घेऊन भाविक परत जात असत. नंतर मंदिर समितीने विठ्ठल प्रसाद म्हणून बुंदीचे लाडू विक्रीला ठेवण्यास सुरुवात केली. विठ्ठल दर्शनाला आलेले भाविक आपल्या गावाकडे जाताना हा लाडू प्रसाद विकत घेऊन जात असतात. मात्र मंदिर समितीने लाडू प्रसाद बनवल्यास समितीला कोट्यवधी रुपयाचा तोटा होत असल्याचे समोर आलं. त्यामुळे याच समितीने 2017 मध्ये लाडू प्रसाद आऊटसोर्सिंग करण्याचा निर्णय घेतला होता. दोन वर्षांपूर्वी एका महिला बचत गटाला हा ठेका दिल्यावर समितीला जवळपास यातून 1 कोटी रुपयाचा फायदा झाल्याचा दावा या बचत गटाकडून करण्यात आला होता. मात्र नंतर कोविड आल्याने या संस्थेचे 8 महिने राहिले असताना लाडू ठेका थांबवण्यात आला होता. नंतर पुन्हा मंदिर सुरु झाल्यावर या संस्थेला तो ठेका न देता एका अधिकाऱ्याने आपल्या जवळच्या संस्थेला हा ठेका दिल्याचा आरोप झाले. या नवीन संस्थेने खराब दर्जाचे लाडू दिल्याचे आरोप झाल्यावर इथे अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकला. हे लाडू वजनात देखील कमी भरत असल्याचे छाप्यात निदर्शनास आल्यावर या संस्थेचा ठेका रद्द करण्यात आला. आता पुन्हा नवीन पारदर्शक पद्धतीने लाडू आऊटसोर्सिंग करण्याऐवजी समितीने आपलाच निर्णय फिरवत पुन्हा मंदिर समितीकडून लाडू बनवण्याचा निर्णय घेतल्याने आरोपास सुरुवात झाली. एका बाजूला मंदिराला कोट्यवधी रुपयांचा तोटा होत असताना पुन्हा समितीकडून लाडू बनवण्याचा तोट्याचा निर्णय कोणासाठी घेतला असा सवाल विचारला जात आहे. मंदिर समितीच्या सहध्यक्षांनी हा निर्णय तात्पुरत्या स्वरुपात घेतला असून आषाढीनंतर पुन्हा टेंडर काढण्यात येईल अशी सारवासारव केली आहे. तर लाडू प्रसादात तोटा होत नाही अशी वेगळीच भूमिका मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी घेतल्याने यातील गोंधळ वाढला आहे. सध्या मंदिर समितीकडून लाडू बनवण्याचे काम सुरु असले तरी या लाडूचे पॅकिंग नसल्याने हातात सुटे विकत लाडू प्रसाद घेण्याची वेळ भाविकांवर आलेली आहे. लवकरच लाडू पॅकिंगमध्ये देऊ, अचानक समितीला लाडू बनवण्याचा निर्णय घ्यावा लागल्याने अजून पॅकिंग साहित्य आले नसल्याचे व्यवस्थापक सांगतात.
शासनाने मंदिर समितीला आदेश द्यावेत, वारकरी संप्रदायाची मागणी
दरम्यान मंदिर समिती लाडू बनावट असताना भाविकांच्या देणगीच्या पैशांची उधळपट्टी होऊन कोट्यवधी रुपयाचे नुकसान होत होते. ठेकेदार संस्थेकडून मंदिर समिती बारा रुपये पन्नास पैशाला लाडू घेऊन भाविकांना 20 रुपयांना विकत असते. त्यामुळे मंदिर समितीच्या तिजोरीत जवळपास वर्षभरात कोट्यवधी रुपये जमा होत असतात. अशावेळी मंदिर समिती हा पांढरा हत्ती कोणासाठी पोसत आहे हा प्रश्न असून जर लाडू खाजगी संस्थेला दिले तर होणाऱ्या फायद्यातून दर्शन रांगेतील भाविकांना मोफत लाडू प्रसाद देण्याची विठ्ठल भक्तांची मागणी आहे. दर्शन रांगेतील भाविकांना मोफत लाडू प्रसाद देण्यास काहीच अडचण नसल्याचे सांगणारे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर मात्र ही सेवा कधी सुरु करणार याबाबत मौन बाळगत आहेत. खरेतर या मंदिर समितीची मुदत संपून जवळपास 2 वर्षे होत आली असली तरी शिंदे-फडणवीस सरकारला अजून नवीन समिती करायला वेळच मिळालेला नाही. मंदिराला गेले 2 वर्षे पूर्णवेळ कार्यकारी अधिकारी नाही. मंदिर व्यवस्थापक गेल्या पाच वर्षांपासून त्याच जागेवर काम करत असल्याने विठ्ठल मंदिर म्हणजे महसूल कार्यालय झाल्याचा आरोप वारकरी संप्रदाय करु लागला आहे. या आषाढीपूर्वी किमान दर्शन रांगेतील भाविकांना मोफत लाडू प्रसाद द्यावा या मागणीवर मात्र वारकरी संप्रदाय आक्रमक होऊ लागले आहेत. आता शासनानेच या समितीला हा निर्णय घेण्याचे आदेश द्यावेत अशी वारकरी संप्रदायाची मागणी आहे.