(Source: ECI/ABP News/ABP Majha)
काय देवेंद्र.. काय लगीनघाई.. काय साक्षगंध..! देवेंद्र भुयारांचाही पार पडला 'साखरपुडा
Devendra Bhuyar Engagement : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार का? ही बातमी मिळते का हे तर माहिती नाही पण देवेंद्र भुयारांचा नक्की साखरपुडा झाला आहे.
अमरावती : राज्यात सध्याचा घडीला सत्ता संघर्ष सुरु असून शिवसेना आपले सरकार वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे तर भाजप आणि बंडखोर शिंदे गट हे नव्याने सरकार स्थापन करण्याच्या हालचाली करीत आहे. मात्र अशा परिस्थितीत अमरावती जिल्ह्यातील मोर्शी-वरुड विधानसभा मतदार संघाचे बहुचर्चित अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी सरकार कुणाचे बसेल याची वाट न पाहता आज आपला साखरपुडा उरकून घेतला आहे. एकीकडे भाजपच्या देवेंद्रना मुख्यमंत्री बनविण्यासाठी भाजपाची 'लगीनघाई' सुरु असून दुसरीकडे राष्ट्रवादीचे आणि विशेषतः उपमुख्यमंत्री अजित पवारांचे लाडके असलेले मोर्शीचे देवेंद्र देखील दोनाचे चार हात करण्याची तयारी करीत आहेत.
आमदार देवेंद्र भुयार यांचा साखरपुडा आज 29 जून रोजी दर्यापूर येथील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयात पार पडला. भुयार यांची होणारी वधू दर्यापूर येथील असून मोनाली दिलीपराव राणे असं त्यांचं नाव. उद्या विधानसभेत बहुमत चाचणी असल्याने आमदार भुयार हे आजच मुंबईसाठी रवाना होणार असल्याची माहिती त्यांनी एबीपी माझाला दिली.
देवेंद्र भुयार हे शेतकरी चळवळीतले कार्यकर्ते. राजू शेट्टी यांचे एकनिष्ठ म्हणून त्यांची ओळख होती. 10 वर्ष त्यांनी राजू शेट्टी यांच्याशी काम केलं. पुढे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राजू शेट्टींनी भुयार यांचं कर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना मोर्शी मतदारसंघातून विधानसभेचं तिकीट दिलं. आश्चर्य म्हणजे भुयार यांनी तत्कालिन कृषिमंत्री अनिल बोंडे यांचा पराभव केला. एका क्षणात ते महाराष्ट्रात लोकप्रिय झाले. विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीत आपल्या एका मताच्या जोरावर संजय राऊतांना भिडणारे आणि अजितदादा सांगतील ती पूर्व दिशा म्हणणारे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार संपूर्ण राज्यात चर्चिले गेले. या निवडणूक निकालाचा धुराळा खाली बसत नाही तोच राज्यात सत्ता संघर्ष सुरु झाला. पण अशातच अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांचं सरकार बहुमतात आलं असून अमरावतीमध्ये त्यांचा साखरपुडा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ते आता लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.