(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Cotton News : कापसाच्या दरात घसरण, सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी; नंदुरबारमध्ये आम आदमी शेतकरी संघटनेची मागणी
Cotton : सरकारनं कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, अशी मागणी नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील आम आदमी शेतकरी संघटनेनं केली आहे.
Cotton News : मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापसाच्या दरात (Cotton Price) मोठी घट झाली आहे. याचा फटका कापूस उत्पादक शेतकऱ्यांना (Farmers) बसत आहे. त्यामुळे सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, अशी मागणी नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील आम आदमी शेतकरी संघटनेने केली आहे. दर वाढत नसल्यानं शेतकऱ्यांनी कापसाची विक्री थांबवली आहे. शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून आहे.
विदर्भनंतर राज्यातील सर्वात मोठा कापूस उत्पादक बेल्ट म्हणून उत्तर महाराष्ट्राची ओळख आहे. उत्तर महाराष्ट्रात जवळपास 15 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली आहे. लागवड जरी जास्त झाली असली तरी कापसाच्या दरात मात्र मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. कापसाच्या दरात कधी वाढ होणार या प्रतिक्षेत राज्यातील शेतकरी आहेत. सध्या कापूस उत्पादनाचा खर्च मोठा वाढला आहे. कारण यावर्षी वाढलेल्या खतांच्या किंमती, बियाणांच्या किंमती तसेच रासायनिक औषधांच्या किंमतीत देखील मोठी वाढ झाली आहे. एकीकडे उत्पादन खर्च वाढला असताना दुसरीकडे कापसाचे दर मात्र वाढत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांनी कापसाची विक्री थांबवली आहे. अशा स्थितीत सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी आम आदमी शेतकरी संघटनेने केली आहे.
सातत्याने कापसाच्या दरात चढ-उतार
यावर्षी कापसाच्या दरात सातत्याने चढ-उतार होत असल्याचे चित्र दिसत आहे. भावात चढउतार होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कापसाचे दर हे 9 हजारांच्या आसपास गेले होते. त्यांनतर लगेच हा दर 8 हजार ते 8 हजार 200 रुपयांच्या आसपास आले. कापूस दरातील या अनिश्चिततेचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. गेल्या वर्षी कापसाला 11 ते 12 हजार रुपयांचा भाव मिळाल्यामुळे यावर्षी देखील कापसाला जास्त भाव मिळेल या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली. त्यातच गारपिटीने कापसाचं मोठं नुकसान झालं आहे.
वस्त्रोद्योगालाही फटका बसण्याची शक्यता
पणन मंडळाने खुल्या बाजारात कापूस खरेदी केली पाहिजे अशी मागणी वाढत आहे. जिनिंग आणि सूत गिरण्यांना कापसाचा पुरवठा मागणीनुसार होत नसल्याने अडचणी वाढू लागल्या आहेत. वस्त्रोद्योगाला याचा फटका बसू शकतो. सूत गिरण्यांमध्ये देखील कापूस गाठींचा साठा कमीच आहे. त्यामुळे कापूस बाजारात अनिश्चितता दिसून येत आहे. यावर्षी उत्तर महाराष्ट्रास विदर्भ आणि मराठवाड्यात कपाशीची लागवड वाढली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: