राजेश टोपे पहिल्यांदाच म्हणाले, होय, तिसरी लाट आलीय, जानेवारी अखेरीस उच्चांक गाठण्याची शक्यता
कोरोना टेस्टिंग किट जर अधिकृत असेल तर त्याला परवानगी असेल अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
मुंबई : राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येचा दर मोठा असून कोरोनाची तिसरी लाट आली असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. सध्या वाढणारी कोरोनाची रुग्णसंख्या ही अजून वाढेल आणि ती जानेवारी अखेरीस उच्चांग गाठेल, त्यानंतर रुग्णसंख्येचा आलेख कमी होण्याची शक्यता असल्याचंही ते म्हणाले. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर कोणताही ताण नसून 85 टक्के रुग्ण हे कोणतीही लक्षणं नसल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात आता जिल्हा स्तरावर होम आयसोलेशन किट तयार करण्यात येणार असून टेस्टिंगची संख्या वाढवणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
राजेश टोपे म्हणाले की, "राज्यात ज्या ठिकाणी लसीकरण जास्त झालं आहे त्या ठिकाणी मृत्यूची संख्या कमी आहे. त्यामुळे लसीकरणाची गती आणखी वाढवण्यावर भर देणार आहे. राज्यातील जवळपास 90 टक्के लोकांनी कोरोनाची पहिली लस घेतली असून 69 टक्के लोकांनी दोन्ही लसी घेतल्या आहेत. "
देशभरात क्वारंटाईनचा कालावधी हा सातच दिवस राहणार, त्यात कोणताही बदल होणार नाही असं केंद्राने सांगितल्याचं राजेश टोपे म्हणाले.
राज्यात सध्या एक लाख 73 रुग्ण सक्रिय रुग्ण आहेत. एकूण रुग्णसंख्येमध्ये 85 टक्के लोक हे लक्षणं नसलेली आहेत तर 13 टक्के लोकांना सौम्य लक्षणं असल्याचं समोर आलं आहे असं राजेश टोपे म्हणाले.
सात दिवसात तीन वेळा रुग्णांची चौकशी
राजेश टोपे म्हणाले की, सात दिवसांच्या होम क्वॉरंटाईनमध्ये राज्य सरकारकडून पहिल्या, पाचव्या आणि सातव्या या दिवशी कॉल केले जाऊन त्या रुग्णांची नोंद ठेवली जाईल.